काम जमत नसेल तर पदे सोडा! – राज ठाकरे

‘इतके दिवस काय काम केले? मतदारयादी तयार का नाही केली? काम जमत नसेल तर पद सोडा’, अशा कडक शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना फटकारले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर पुण्यात आयोजित बैठकीत मतदारयादी तयार करण्याचे आदेश दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ते संतापले.

ऑगस्ट महिन्यात राज ठाकरे यांनी पुण्यात येऊन सर्व पदाधिकाऱ्यांना मतदारयादी तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मतदारयादीतील घोळ उघड करण्यासाठी आणि वोट चोरी थांबविण्यासाठी हे काम तातडीने पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, बुधवारी झालेल्या आढावा बैठकीत एकाही पदाधिकाऱ्याने मतदारयादी तयार केली नव्हती. यामुळे रागावलेल्या राज ठाकरे यांनी काही कार्यकर्त्यांना थेट सुनावले.

राज ठाकरे म्हणाले, दिलेली जबाबदारी पूर्ण न करणाऱ्यांना पक्षात स्थान नसून, ‘जे काम करत नाहीत त्यांना पक्षात ठेवायचे नाही, त्यांना थेट बाहेर काढा,’ असे आदेश त्यांनी दिले. बैठकीत मतदारयादी, बूथ बांधणी या विषयांवर पदाधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने राज ठाकरे नाराज झाले होते.