
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
जैश-ए-मोहम्मदने केलेली ‘ जमात-उल-मुमिनात’ची स्थापना हे भारतासाठी एक मोठे आव्हान आहे. प्रपोगंडा वॉर, मानसशास्त्रीय युद्ध, सोशल मीडियावर नकारात्मक आशय आणि समाजात धार्मिक वादविवाद यांसारख्या गोष्टी जाणीवपूर्वक घडवून आणल्या जाऊ शकतात. भारतीय नागरिक म्हणून आपण किती सतर्क राहणे आवश्यक आहे हेच यातून स्पष्ट होते.
कट्टर इस्लामी दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’ (JeM) ने आपली धोरणे बदलून ‘जमात-उल-मुमिनात’ या नावाची महिला आत्मघातकी दहशतवादी संघटना स्थापन केली आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’चा प्रमुख आणि संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी म्हणून घोषित केलेला मसूद अजहर याची बहीण सादिया अजहर या महिला संघटनेची प्रमुख आहे. सादियाचा पती युसुफ अजहर हा भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान, मरकज सुबहान अल्लाह येथील ‘जैश-ए-मोहम्मद’च्या मुख्यालयावर केलेल्या हल्ल्यात मारला गेला होता.
‘जैश-ए-मोहम्मद’ची ही भूमिका बदलण्यामागे ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पुरुष दहशतवाद्यांची झालेली कमतरता हे आहे. या बदलातून ‘ऑपरेशन सिंदूर’चा आघात किती खोलवर झाला आहे, याची कल्पना येते. ‘जमात-उल-मुमिनात’ची भरती प्रक्रिया पाकिस्तानातील बहावलपूर येथील मरकज उस्मान-ओ-अली येथे सुरू झाली असून संघटनेने शहरी आणि सुशिक्षित महिलांना लक्ष्य करून व्हॉट्सऍपसारख्या सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’साठी मारल्या गेलेल्या सैनिकांच्या पत्नींची यादी तयार करणे, तसेच बहावलपूर, कराची, मुझफ्फराबाद, कोटली, हरीपूर आणि मानसेहरा येथील अभ्यास केंद्रातील महिलांना यात सहभागी करून घेण्यावरही भर दिला जात आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान, भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात सुमारे 100 किमी आत असलेल्या जैशच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. या हल्ल्यात मसूद अजहरच्या कुटुंबातील दहा सदस्य आणि त्याचे चार निकटवर्ती सहकारी मारले गेले होते. यात त्याची मोठी बहीण, तिचा पती, एक भाचा, त्याची पत्नी, एक भाची आणि पाच इतर नातेवाईकांचा समावेश होता.
या संघटनेची योजना फिदायीन (आत्मघातकी) दहशतवादी तयार करणे आणि त्यांचा वापर करणे अशी आहे. जैशने त्यांचे प्रशिक्षण केंद्र आता पाकव्याप्त कश्मीरमधून तुलनेने भारतीय सीमेपासून दूर असलेल्या खैबर पख्तूनख्वा येथे हलवले आहे. ‘जमात-उल-मुमिनात’ ही नवीन महिला संघटना, ‘जैश-ए-मोहम्मद’च्या मानसिक युद्धाच्या आणि स्थानिक स्तरावरील भरतीच्या बदलत्या धोरणाचा एक भाग आहे. ही संघटना जम्मू-कश्मीर, उत्तर प्रदेश आणि दक्षिण भारतातील शिक्षित, शहरी मुस्लिम महिलांना लक्ष्य करत असून, त्यासाठी त्यांचे जाळे ऑनलाइन पसरवले जात आहे. जैशच्या रचनेप्रमाणे, ही संघटना ‘सेल-आधारित’ गुप्त रचना वापरते. या महिला गटांना भरती करणे, संदेश पोहोचवणे आणि निधी गोळा करणे यासाठी तयार केले जात आहे. त्या पुरुष सहकाऱ्यांना लॉजिस्टिक सहाय्य (logistic support) देतात आणि कुणाच्या लक्षात येणार नाही अशा प्रकारे कार्य करतात. ‘जमात-उल-मुमिनात’चे साहित्य, डिझाईन आणि धार्मिक भाषाशैली पाकिस्तानातील अल-मुहाजीरात आणि बहावलपूरमधील मरकज उस्मान-ओ-अली यांच्या प्रकाशनांशी साधर्म्य साधतात.
महत्त्वाची बाब म्हणजे, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये उद्ध्वस्त झालेली ठिकाणे पाकिस्तानने पुन्हा बांधायला सुरुवात केली आहे. निधी जमा करण्यासाठी ईझी पैसा (Easypaisa) सारख्या माध्यमातून ऑनलाइन पैसेही मिळवले जात आहेत. 313 नवीन ‘मरकझ’ तयार करण्यासाठी 3.91 अब्ज रुपये उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
जे दहशतवादी जैशसाठी ठार झाले आहेत, त्यांच्या पत्नी, बहिणी आणि मुली हे त्यांचे पहिले लक्ष्य आहेत. कारण त्यांची सूडाची भावना सहज प्रज्वलित करता येते. संघटनेसाठी बलिदान देण्याचा अनुभव आणि त्याबद्दलचा अभिमान त्यांच्यात असतो.
दहशतवादी संघटना महिलांची भरती करतात, कारण :
महिलांवर लगेच कोणी संशय घेत नाही.सुरक्षा यंत्रणांच्या तपासणीतून महिला सुटू शकतात. शस्त्रे पोहोचवणे आणि पुरुष दहशतवाद्यांना स्वयंपाक, देखभाल यांसारखे ‘लॉजिस्टिक’ सहाय्य करणे. काही ठिकाणी त्यांचा वापर ‘सेक्स स्लेव्ह’ म्हणूनही केला जातो. महिला दहशतवाद्यांचा वापर अनेक ‘नॉन-कायनेटिक’ (अप्रत्यक्ष) कार्यांसाठी केला जातो. दहशतवादी संघटनांसाठी महिला आर्थिक व्यवहार व्यवस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. त्या अकाऊंटंट म्हणून काम करतात, बँक खाती सांभाळतात आणि निधी वळवण्यासाठी वैध भासणाऱ्या धर्मादाय संस्थांना आघाडी म्हणून चालवतात.
महिला दहशतवादी गुप्तचर आणि टेहळणी मोहिमांसाठी अत्यंत प्रभावी साधन आहेत. त्या सैन्य किंवा महत्त्वाच्या क्षेत्राजवळ तीव्र तपासणीशिवाय फिरू शकतात. अनेक वेळा ‘हनी ट्रप’चा वापरही केला जातो.
ओव्हर ग्राऊंड वर्कर्स (OGW) : जम्मू आणि कश्मीरमध्ये महिलांनी बऱ्याच काळापासून ‘ओव्हर ग्राऊंड वर्कर’ म्हणून काम केले आहे. यामुळे दहशतवादी गटांना स्थानिक लॉजिस्टिक समर्थन (सुरक्षित निवासस्थान, पैसे आणि शस्त्रे वाहतूक) मिळते.
महिला आत्मघातकी बॉम्बचे काम अतिशय उत्कृष्टपणे करू शकतात. 1991 मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येमध्ये एका महिला दहशतवाद्याचा हात होता.
महिला दहशतवाद्यांना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना :
दहशतवादविरोधी आणि सुरक्षा कार्यामध्ये अधिक महिला अधिकारी तैनात करणे आवश्यक आहे
विशेष घुसखोरी प्रतिबंधक पथके : महिला अधिकाऱ्यांनी नियंत्रण रेषेवरील (LoC) जिह्यांमध्ये, महत्त्वाच्या तपासणी ठिकाणी आणि VVIP सुरक्षा व्यवस्थेत खास भूमिका घ्यावी. महिला अधिकारी संशयित महिलांची सतर्कपणे तपासणी करू शकतात.
‘जमात-उल-मुमिनात’ (JuM) च्या लपूनछपून कार्य करण्याच्या पद्धतीचा परिणाम कमी करता येतो.
गुप्तचर माहिती गोळा करणे : महिलांच्या कट्टरपंथातील आर्थिक, लॉजिस्टिक आणि गुप्त माहितीच्या भूमिकेसंबंधी डेटा संकलन आणि विश्लेषण करणे आवश्यक आहे. सुरक्षा यंत्रणांनी ‘हनी ट्रप’सारख्या कारवायांवर लक्ष ठेवावे.
नेटवर्क उद्ध्वस्त करणे : महिला ‘OGW नेटवर्क’ आणि त्यांच्या सुरक्षित ठिकाणांना उद्ध्वस्त करण्यासाठी ‘सर्च अँड कॉर्डन ऑपरेशन’ (CASO) नियमितपणे राबवावी.



























































