ठसा – सुलक्षणा पंडित 

>> दिलीप ठाकूर

दूर का राही’ (1972) या चित्रपटातील ‘बेकरार-ए-दिल तू गाये जा…खुशीयो से भरे वो तराने’ हे गाणे लोकप्रिय झाले. रेडिओ विविध भारतीवर सतत ऐकू येऊ लागले. या गाण्यासाठी ध्वनिमुद्रिकाची विक्री वाढली आणि या गाण्यात किशोर कुमार यांच्यासोबतची पार्श्वगायिका कोण याबाबत असलेली उत्सुकता सुलक्षणा पंडित या नावाने पूर्ण झाली. हे गाणे इर्शाद यांनी लिहिले असून संगीत किशोर कुमार यांचे आहे. या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक किशोर कुमार आहेत. पडद्यावर हे गाणे अशोक कुमार व तनुजा यांनी साकारलेय. सुलक्षणा पंडित यांच्या निधनाचे वृत्त समजताच हे गाणे आठवले.

सुलक्षणा पंडित यांचा जन्म 12 जुलै 1954 चा. आताच्या छत्तीसगडमधील रायपूर येथील. वडील नारायण पंडित हे शास्त्राrय गायक. सुलक्षणा पंडित वयाच्या नवव्या वर्षी गायन शिकल्या. सुरुवातीला उत्तम गायिका, मग पार्श्वगायिका अशी वाटचाल करीत असलेल्या सुलक्षणा पंडित यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. ‘संकल्प’ चित्रपटातील सुलक्षणा पंडित यांनी गायलेले ‘तू ही सागर, तू ही किनारा’ हे गाणे लोकप्रिय ठरले.

सुलक्षणा पंडित यांनी नायिका म्हणून कारकीर्द करायचे ठरवले तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत हेमा मालिनी, रेखा, राखी यांची विलक्षण चलती होती. अगोदरच्या काळातील वहिदा रेहमान, आशा पारेख, सायरा बानू, शर्मिला टागोर, तनुजा कार्यरत होत्या. तेव्हाच्या नवीन पिढीतील मौशमी चॅटर्जी, झीनत अमान, परवीन बाबी, नीतू सिंग, शबाना आझमी, रिना रॉय, आशा सचदेव यांना मागणी वाढत होती. त्यात स्वतःचे स्थान निर्माण करणे सोपे नव्हते. त्याच वेळेस दोन नायिका असलेल्या चित्रपटात सुलक्षणा पंडित यांना संधी मिळाली आणि त्यांची वाटचाल सुरू झाली. रघुनाथ झालानी दिग्दर्शित ‘उलझन’ चित्रपटात भूमिका साकारत असताना संजीव कुमारांशी नाव जोडले. गॉसिप मॅगझिनमधून बरेच काही लिहून आले, पण त्याचा कारकीर्दीला काहीच फायदा झाला नाही.

सुलक्षणा पंडित यांना त्या काळातील जे. ओमप्रकाश, प्रकाश मेहरा, सुल्तान अहमद, सत्पाल अशा मान्यवर दिग्दर्शकांच्या चित्रपटांत भूमिका साकारायची संधी मिळाली हे विशेष आहे. ‘संकल्प’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘उलझन’, ‘हेरा फेरी’, ‘शंकर शंभू’, ‘अपनापन’, ‘गोरा धरम काटा’, ‘शिव शक्ती’, ‘कसम खून की’, ‘बगदाद का चोर’, ‘फांसी’, ‘राजा’, ‘खानदान’, ‘बंडल बाज’, ‘सलाखे’ इत्यादी चित्रपटांतून भूमिका साकारल्या. ‘बंडल बाज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता शम्मी कपूर यांचे होते आणि नायक राजेश खन्ना होता. सुलक्षणा पंडित यांची एक यशस्वी घौडदौड सुरू होती, पण 1988 ‘चव दो वक्त की रोटी’ या चित्रपटानंतर सुलक्षणा पंडित यांना चित्रपट मिळालेच नाहीत. याच चित्रपटाच्या फिल्मालय स्टुडिओतील सेटवर सुलक्षणा पंडित यांच्या भेटीचा सुखद योग आला असता ती आपल्या वाटचालीबद्दल समाधानी वाटली हे उल्लेखनीय.

त्या गायनाचे कार्यक्रम करतात अशी चर्चा होत राहिली. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘खामोशी द म्युझिकल’ (1995) या चित्रपटासाठी त्या गायल्या. त्यानंतर त्या या झगमगाटापासून पूर्णपणे दुरावल्या.

त्यांची बहीण विजयता पंडित अभिनय क्षेत्रात आली, तर भाऊ जतिन व ललित हे संगीतकार झाले. योगायोग कसा असतो ते बघा, ज्या संजीव कुमार यांच्याशी सुलक्षणा पंडित यांचे खास नाते होते असे कायमचे म्हटले गेले, त्याच संजीव कुमार यांच्या चाळीसाव्या स्मृतिदिनी सुलक्षणा पंडित यांचे निधन झाले. एखाद्या चित्रपटात घडावा असाच हा प्रसंग.

ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात म्हणजेच संजीव कुमार यांच्या निधनानंतर सुलक्षणा पंडित मागे मागे पडल्या. अशा कलाकारासाठी कोणी वाट पाहत नाही. चरित्र भूमिका हाच एक पर्याय असतो. अधूनमधून बातमी येत असे की जुहू परिसरात सुलक्षणा पंडित मंदिरात वगैरे जाताना दिसतात वगैरे वगैरे, पण पुढे काहीच नाही.

उपग्रह वाहिनीवर ‘उलझन’, ‘हेरा फेरी’ या चित्रपटातील गाणे पाहताना त्यात सुलक्षणा पंडित दिसत असे इतकेच.