
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा शेतकऱ्यांना निर्दयी सरकारविरुद्ध लढण्याचे बळ देत आहे. आज दौऱ्याच्या तिसऱया दिवशीही उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी आणि नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे यावर जोर देताना महायुती सरकारवर चाबकाचे फटकारे लगावले. महायुती सरकार चोर आहे, असा भीमटोला त्यांनी लगावला. नुसता बैलांवर नको, सरकारवर आसुड ओढा, व्होटबंदीचा निर्धार करा, अब की बार…जाईल सरकार, अशा शब्दांत उद्धव ठाकरे कडाडले.
मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांच्या ‘दगाबाज रे’ शेतकरी संवादात अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आपल्या व्यथा मांडत आहेत. आतापर्यंत तेथील सहा जिह्यांत उद्धव ठाकरे यांचे दौरे झाले आहेत. आज लातूरमधील भुसणी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे नांदेड जिह्यातील अर्धापूर पार्डी गावात पोहचले. हिंगोलीच्या कळमनुरी येथील वारंगा गावात अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या अडचणी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. उद्धव ठाकरेसुद्धा शेतकऱ्यांना धीर देत प्रतिकूल परिस्थिती आणि निर्दयी सरकारविरुद्ध लढण्याचे बळ देत आहेत. सत्तेसाठी नव्हे सत्यासाठी गावाच्या पारावर आलोय असे सांगत शेतकऱ्यांना हिंमत देत आहेत.
शक्तिपीठ लादलात तर शेतकरी सरकारचे पीठ करतील
शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेतल्या जात आहेत. शक्तिपीठसाठी 85 हजार कोटींचा प्राथमिक खर्च केला जात आहे आणि नंतर तो सतत वाढत जाणार आहे. हा पैसा कंत्राटदारांना मिळणार. कंत्राटदारांना पैसा द्यायला हे कुभांड रचले असेल तर शेतकऱ्यांना द्यायला सरकारकडे पैसे का नाहीत, असा सडेतोड सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. शेतकऱ्यांना शक्तिपीठचा रस्ता नको, पण सरकार ऐकत नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या नाहीत तर शेतकरी राज्य सरकारचे पीठ करतील, असा इशारा त्यांनी दिला.
पंधरा दिवसांत विमा कंपन्यांवर मोर्चा काढणार
बँकांनी कर्जफेडीसाठी तगादा लावल्याने निराश होऊन विदर्भातील चंद्रपूरच्या राजुरात यशोदा राठोड या 68 वर्षीय शेतकरी महिलेने आत्महत्या केली. ती बातमी यावेळी उद्धव ठाकरे यांनी दाखवली आणि मुख्यमंत्री त्या शेतकऱयाच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन का करत नाहीत, असा सवाल केला. येत्या 15 दिवसांत विमा कंपन्यांनी किती जणांना पीक विम्याची भरपाई दिली ती यादी बघू आणि विमा कंपन्यांवर मोर्चा काढू, असा इशाराही त्यांनी दिला. भाजपचा हा संभ्रम घोटाळा आहे. डोळय़ादेखत पैसा खाताहेत, ड्रायव्हरच्या नावाने जमीन लाटताहेत, पण आपण मात्र डोळे बंद करून संभ्रमात आहोत.
जिल्हा कार्यालयांना घेराव घालून अधिकाऱ्यांना जाब विचारा
अतिवृष्टीग्रस्त भागात अजूनही अनेक ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत. कारण अधिकारीच येत नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांना भरपाई देण्याची जबाबदारी असलेल्या प्रत्येक जिल्हा कार्यालयाला घेराव घालून अधिकाऱ्यांना जाब विचारा, तिथे ठाण मांडूनच बसा. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये प्रचारात बिझी आहेत, असे आदेश यावेळी उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील शिवसेनेच्या आमदार-खासदारांना देत फडणवीसांवरही निशाणा साधला.
आजचा दौरा
सकाळी 10 काजता ताड बोरगाव, मानवत
सकाळी 11.30 वाजता ढेंगळी पिंपळगाव, सेलू
दुपारी 2 वाजता पाटोदा, परतूर
सायंकाळी 6 वाजता लिंबोणी, घनसांवगी
शेतकरी भिकेला लागलाय, सरकार जगू देत नाही! 90 वर्षांचे शेतकरी गोविंद लांडे ढसाढसा रडले
अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेला शेतकरी जिवाच्या आकांताने ओरडून सांगतोय…नुकसानभरपाई द्या, कर्जमाफी द्या. पण निर्दयी महायुती सरकारला पाझर फुटत नाही. शेतकरी भिकेला लागलाय तरीही सरकार मदत करत नाही, जगायचे कसे, सरकार जगू देत नाही, अशी व्यथा मांडताना 90 वर्षीय शेतकरी गोविंद लांडे आज ढसाढसा रडले.
कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा गावात उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी हिंगोलीतील वरुड गावचे शेतकरी गोविंद लांडे यांनी आपली व्यथा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. अतिवृष्टीत माझ्या शेतातील सर्व पिके नष्ट झाली. सरकारने आतापर्यंत कर्जमाफीचे फक्त आश्वासन दिले, पण कोणत्याही प्रकारची कर्जमाफी केली नाही, पाच पैसेही दिले नाहीत, असे त्यांनी सांगितले.
अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचा कापूस गेला. ज्वारी गेली. सोयाबीन काहीच झाले नाही. सावकाराकडून, बँकांकडून कर्ज घेतले होते. आता ते फेडायला पैसे नाहीत. कुठून फेडणार कर्ज? नवीन कर्ज देत नाहीत. शेतकरी घोर संकटात सापडला आहे, असे सांगताना लांडे यांचा आवाज कापरा झाला. त्यांच्या डोळय़ातून ढळाढळा अश्रू वाहू लागले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर दिला.
कर्जमाफी करू म्हटले होते. ती केली नाही. दिवाळीपर्यंत मदत देऊ असे सांगितले होते, तीही मिळाली नाही. खरीपाचा मोसम निघून गेला. रब्बीला पेरायचे काय? खताचे भाव भयंकर वाढलेत, खते कुठून आणायची, असा संताप लांडे यांनी व्यक्त केला. शक्तिपीठचे अधिकारी निजामापेक्षा अधिक अत्याचार करत आहेत, अशी कैफियतही लांडे यांनी मांडली.





























































