एशियाटिक सोसायटीची निवडणूक पुढे ढकलली; मतदार यादीत घोळ, अनेक अर्जांची छाननी प्रलंबित

सुमारे दोन शतकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या ‘दि एशियाटिक सोसायटी’ या संस्थेची 8 नोव्हेंबर रोजी होणारी निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. मतदार यादीची पडताळणी पूर्ण न झाल्याने, मोठ्या प्रमाणात सदस्यत्व अर्ज प्रलंबित असल्याने आणि मतदार यादीतील त्रुटीमुळे निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आज झालेल्या व्यवस्थापक समितीच्या बैठकीत याबाबतचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. तसे पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले.

एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून वादाला तोंड फुटले आहे. संस्थेवर वर्चस्व मिळवण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणात सदस्यत्व नोंदणी अर्ज भरून घेण्यात आले, असे आरोप- प्रत्यारोप झाले होते.

व्यवस्थापन समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या 6 नोव्हेंबर 2025 च्या आदेशाची ही नोंद घेतली असून त्यानुसार मतदार यादीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ते निर्णय घेतल्यानंतर पुढील तारीख निश्चित केली जाणार आहे, असे एशियाटिक सोसायटीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

3480 जणांची मतदार यादी सदोष आहे. त्यात मृत सदस्यांची नावेही आहेत. ज्यांनी सदस्यत्व खंडित केलेय, ज्यांचे सदस्यत्व फी न भरल्यामुळे खंडित झालेय असे सदस्यही यादीत आहेत.