गुजराती कंपनी पालिकेच्या हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये फेल, सुधारणेसाठी एक महिन्याची मुदत; अन्यथा काम बंद; पालिका आयुक्तांनी घेतले फैलावर

मुंबई महानगरपालिकेच्या मोठ्या रुग्णालयांमध्ये ‘हॉस्पिटल मॅनेजमेंट सेवा’ राबवण्यासाठी नेमण्यात आलेली गुजरातची कंपनी पूर्णपणे फेल ठरली आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱया गोरगरीब रुग्णांना ताटकळत रहावे लागत असून रुग्णसेवेवरही मोठा परिणाम होत आहे. उपचाराला विलंब होत असून शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ येत आहे. याची गंभीर दखल पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घेतली असून कंपनीला चांगलेच फैलावर घेतल्याचे समजते. शिवाय एका महिन्यात कारभार सुधारा, अन्यथा कंपनीची सेवा बंद करण्याचा इशाराही पालिकेकडून संबंधित कंपनीला देण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेची केईएम, नायर, शीव आणि कूपर अशी मोठी रुग्णालये आहे. या ठिकाणी दर्जेदार आणि मोफत उपचार मिळत असल्याने हजारो गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयांमध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंट प्रणाली पुरवण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या रेलटेल कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. 2022 पासून ही कंपनी पालिका रुग्णालयांत हे काम करीत आहे. मात्र ही कंपनी स्वतः काम करीत नसून सबकॉण्ट्रक्ट देऊन काम करीत आहे. मात्र संबंधित कंपनीकडून कामाबाबत प्रचंड गोंधळ निर्माण होत आहे. यामुळे आरोग्य सुविधांवर परिणाम झालेला असताना रुग्णालय प्रशासनांकडून मात्र सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

804 कोटींचे कंत्राट, मात्र नाहक मनस्ताप!

महानगरपालिकेच्या रुग्णालयातील केसपेपरपासून पुढील अनेक कामे कंत्राटदाराकडून सुरू आहेत. या कामासाठी पालिकेने संबंधित कंत्राटदाराला 804 कोटींचे कंत्राट दिल्याचे समजते.

शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागत असून रुग्णांना हेलपाटे मारावे लागत आहेत. याबाबत आलेल्या अनेक तक्रारींची प्रशासनाने अखेर दखल घेतली असून संबंधित कंपनीला फैलावर घेतले आहे.