
महाराष्ट्राची भूमी ही संत भूमी आहे. मध्ययुगीन कालखंडात वैचारिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात अनागोंदी माजली होती. तेव्हा संत संप्रदायाने समाजाला योग्य दिशा दाखवली. याच काळात विपुल संत साहित्य निर्मिती झाली. यात स्त्री संत कुठेही मागे नव्हत्या. त्या काळात स्त्रियांवर अनेक बंधने होती मात्र तरीही या स्त्रियांनी भक्तीरसात रममाण होत आध्यात्मिक उन्नती साधली. यातीलच एक म्हणजे संत सखुबाई. पूर्वी महिलांचे जीवन फक्त चूल आणि मूल असे होते. परंतु त्याही काळात संत सखुबाईंनी ही परंपरा मोडण्याचे धाडस केले होते. भागवत भक्ताला फक्त पंढरीला जाता यावे, हरिनाम भजन करता यावे याची ओढ असते. सासर श्रीमंत मिळाले तरी त्यांना हर प्रकारे जाच झाला. त्यांच्या भक्तीमार्गात येणाऱया या छळवादाला कंटाळून सखुबाईंनी साक्षात पांडुरंगालाच साद घातली आणि पांडुरंग त्यांच्या मदतीला आला. पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाच्या ओढीने गेलेल्या सखुबाईंच्या जागी अवतीर्ण होत पांडुरंग तिच्या घरी रांधू लागला. पुण्यपावन झालेल्या सखुबाईचा हा भक्तीमार्ग शेवटी तिच्या सासरच्यांनीही स्वीकारला, अशी आख्यायिका आहे. सखुबाईंनी अनेक रचना केल्या, भजने रचली आणि पांडुरंगाच्या नामस्मरणात आयुष्य सार्थकी केले.


























































