
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून आज चौथ्या दिवशी त्यांनी परभणीतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दगाबाज सरकारविरुद्ध लढण्याचे बळ दिले. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशी मागणी करत उद्धव ठाकरे यांनी मतचोरीनंतर जमीनचोरी करणाऱ्या सरकारवर आसूड ओढला. पक्ष चोरला, मत चोरले आणि आता हे जमीनही चोरायला लागले आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी सरकारच्या दगाबाज आणि बोगस कारभारचा जाब विचारण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, शिवसेना नेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, रविंद्र धर्मे व महानगरप्रमुख विवेक नावंदर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूरस्थिती, रखडलेली कर्जमुक्ती, पंचनामे यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरण्याऐवजी बिहारमध्ये प्रचारात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे अजित पवार म्हणतात सगळे फुकटच पाहिजे का? हातपाय हलवा. यांना हातपाय न हलवता जमीन मिळाली, पण मराठवाड्यात 100 वर्षात आली नाही अशी आपत्ती आली असून पंचनामे करून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी. आता नाही कर्जमुक्ती करायची तर कधी करायची? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. वेळेत पंचनामे झाले नाही आणि नुकसान भरपाई मिळाली नाही तर शेतकरी तहसीलदाराला घेराव घालतील आणि शेतकऱ्यांसोबत शिवसैनिकही रस्त्यावर उतरतील असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
आपला पक्ष चोरला, मत चोरले आणि आता जमीनही चोरायला लागले. कालच एक प्रकरण समोर आले. यावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. पण प्रतिक्रिया देऊन काहीच होणार नाही. मुख्यमंत्री म्हणताता कुणाची गय केली जाणार नाहबी. पण चौकशी समिती नेमतील, क्लिन चीट देतील आणि संपला विषय. हे प्रकरण समोर येण्याआधी जैन मठाचे प्रकरण समोर आले होते. हा असा कारभार बघितल्यावर सरकारला मतचोरीशिवाय दुसरा पर्याय नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी ईव्हीएम आणि बोगस मतदान करून मतचोरी करणाऱ्या सरकारवर निशाणा साधला. आम्ही म्हणतो मशालीचे बटण दाबले की मत शिवसेनेला जाते, शरद पवार म्हणतात तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरील बटण दाबले की मत राष्ट्रवादीला जाते, हाताचे बटण दाबले की मत काँग्रेसला मिळते, पण भाजपवाले सांगतात कोणतेही बटण दाबा मत आम्हालाच मिळेल. ही लोकशाही असून या लोकशाहीमध्ये तुम्ही न्याय मागितला तर देशद्रोही आहात, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणतात कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि समितीचा अहवाल एप्रिल 2026 पर्यंत येणे अपेक्षित आहे. त्यानंतर जूनमध्ये कर्जमाफी करणार. पण कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती हवी आहे. कारण माफी गुन्हेगाराला करतात. आता शेतकरी संकटात असून जूनच्या कर्जमुक्तीचा गूळ कोपराचा लावला करत कसे चालणार. पंचनाम्यासाठी 18 जुलैला समितीची घोषणा झाली. जुलैपासून ही समिती झोपली आहे का? आता केंद्राचे पथक येऊन गेले. महापालिका निवडणुका पाहून पंतप्रधान मोदीही तोंडाला पानं पुसण्यासाठी पॅकेज जाहीर करतील. पण मदत आता हवी आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी दगाबाज सरकारला जाब विचारण्याचे आवाहन केले. जोपर्यंत लढत नाही, तोपर्यंत मिळत नाही. तुम्ही सगळे एकवटून सरकारचा श्वास कोंडत नाही तोपर्यंत तुमच्याकडे कोण लक्ष देणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. दगाबाज सरकारविरुद्ध लढण्यासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना तुमच्यासोबत आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.




























































