
>> अक्षय मोटेगावकर
आयआयटीयन आणि शिक्षणतज्ञ संदीप मानुधने यांची व्याख्याने ऐकणे म्हणजे जग समजून घेण्याचा, स्वतला समृद्ध करण्याचा राजमार्ग.
माझे लहानपण अंबाजोगाईत गेले. अंबाजोगाईला मराठवाडय़ाचे पुणे म्हटले जायचे. सांस्कृतिक आणि शिक्षण परंपरेच्या दृष्टीने अंबाजोगाई खूप समृद्ध होते. अंबाजोगाईमध्ये साहित्य, संगीत आणि कला क्षेत्रातील कार्यक्रमांची रेलचेल असायची. स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला, यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह, नरहर कुरुंदकर स्मृती समारोह, ताई महोत्सव, गणेशोत्सव व्याख्यानमाला, योगेश्वरी आणि खोलेश्वर या शिक्षण संस्थांनी व मानवलोक या सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या व्याख्यानमाला असं खूप काही सतत चालू असायचं. खूप मोठमोठी मंडळी व्याख्यानासाठी येत असत. शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर, शिवाजी सावंत, विश्वास मेहेंदळे, वीणा गवाणकर, भालचंद्र नेमाडे, आनंद यादव अशा असंख्य नामवंत मंडळींना मी अंबाजोगाईतच ऐकले. याच काळात माझा ऐकण्याचा पिंड तयार होत गेला.
पुढे शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरला गेल्यानंतरही अनेक मान्यवरांची व्याख्याने ऐकली. तिथली एक दीर्घकाळासाठी छाप सोडलेली आठवण म्हणजे अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला असताना मी ‘प्रोफेशनल टय़ुटोरिअल्स’ या संस्थेत प्रवेश घेतला होता. सतीश तांबट हे तिथे सेन्टर डायरेक्टर होते. प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्त्व. त्यांनी ‘लॉन्ग मार्च ऑफ चायना’ या विषयवार अडीच तासांचे एक सलग व्याख्यान घेतले होते. त्याक्षणी पुन्हा एकदा जाणवले की, बोलण्यात किती जादू असते आणि ऐकण्यातून किती ऊर्जा मिळते ते. पुढे पुण्याला आल्यावर तर अक्षरश पुणे तिथे काय उणे हाच अनुभव होता. कित्येक दिग्गज मंडळींना याची देही याची डोळा पाहायची आणि ऐकायची संधी पुण्यातच मिळाली. पुढे व्याप वाढल्यानंतर मात्र यूटय़ूबसारखी माध्यमं मदतीला आली.
यूटय़ूब पाहताना सगळ्यात आधी प्रोफेशनल टय़ुटोरिअल्सचे व्हिडीओज आहे का हे शोधले आणि लक्षात आले की प्रोफेशनल टय़ुटोरिअल्सचे संस्थापक, आयआयटीयन आणि शिक्षणतज्ञ असलेले संदीप मानुधने यांची खूप सारी व्याख्याने आहेत. ते अभियांत्रिकी, व्यवस्थापन, राज्य लोकसेवा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करून घेतात. राज्य आणि केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या परीक्षांसाठी जागतिक तत्त्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, भाषा, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, चालू घडामोडी, तर्कसंगत विचारसरणी यांसारख्या विषयांवरची खूप सारी व्याख्याने आहेत.
त्यांची आवडणारी गोष्ट म्हणजे, ते कुठल्याही पक्षाची, विचारधारेची, व्यक्तीची री न ओढता सत्य घटनांचा मागोवा घेतात. गोष्टी आणि तथ्य निष्पक्षपणे समोर ठेवतात. दर्शकांनी, श्रोत्यांनी त्यांच्या त्यांच्या विचार सरणीप्रमाणे काय योग्य अयोग्य, कोण चूक-बरोबर, काय करायला हवे होते, काय केले गेले हे ठरवावे. संदीप मानुधनेंच्या यूटय़ूब चॅनेलला 50 हजार पेक्षा अधिक सबक्राइबर्स आहेत आणि 303 ज्ञान व माहितीवर्धक व्हिडीओज आहेत, ही निश्चितच सोपी गोष्ट नाहीये.
जागतिक इतिहास, भारतीय इतिहास, आयओपनर सीरिज, मुलाखती, व्यक्तिमत्त्व विकास, ताज्या घडामोडी, इंग्रजी बोलणे यांसारख्या असंख्य व्हिडीओजमधून संदीप मानुधने आपल्या समोर येतात. या सर्वांची माझी सुरुवात झाली ती त्यांच्या पहिल्या व दुसऱया महायुद्धाच्या व्हिडीओजपासून. संपूर्ण महायुद्धाचा पट, पार्श्वभूमी, रणनीती, सहभागी राष्ट्रांच्या भूमिका या सगळ्यांवर ते विस्ताराने बोलतात. दहशतवादावर त्याची कारणमीमांसा करणारा व्हिडीओ पाहिल्यावर जागतिक दहशतवादाची कारणे, तो कसा फोफावला, कोणी त्याला खतपाणी दिले हे सगळं कळतं. जागतिक हुकूमशहांवर आधारित व्हिडीओ सीरिज मध्ये ते स्टालिन, हिटलर, माओ इत्यादी हुकूमशहांवर बोलतात. भारतीय आणि चिनी दार्शनिक या सीरिजमध्ये ते चाणक्य, कौटिल्य, कबीर याबरोबरच कनफ्युशिअस, लाओत्सु यांसारख्या विचारवंतांवर बोलतात. जागतिक स्तरावरील नेत्यांवर, घोटाळ्यांवर, रहस्यांवर, चित्रपटांवर, अर्थशास्त्रावर, कॅपिटलिजम, सोशालिजम, कम्युनिजमवर, इंग्रजी भाषेवर, त्यातील कवितांवर बोलतात व प्रत्येक वेळी आपल्या साधार आणि सप्रमाण मांडणीने ते आपल्याला स्वतकडे खेचून घेतात.
ज्यांना जग समजून घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी संदीप मानुधने यांचे व्हिडीओज हा राजमार्ग आहे. यूटय़ुबच्या समुद्रातील माहितीचा हा खजिना तुमच्यासोबत वाटता येणं हा वेगळा आनंद आहे.
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)
























































