अनवट काही – मराठी भाषा शुद्धीकरण का व कशासाठी?

>> अशोक बेंडखळे

‘भाषा शुद्धिविवेक’ हे भाषाशुद्धी विचाराला चालना देणारे कविवर्य माधव जुलियन ऊर्फ प्रा. माधवराव पटवर्धन यांचे पुस्तक असून त्यात भाषाशुद्धीविषयक त्यांची भूमिका मांडणारे अकरा लेख संकलित केले आहेत. हे सर्व लेख महाराष्ट्र साहित्य संमेलन तसेच इतर काही संस्थांच्या व्यासपीठावरून आणि काही नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेले आहेत. लेखांचे हे पुस्तक एप्रिल 1938 मध्ये प्रसिद्ध झाले आणि आर्य संस्कृती मुद्रणालयाचे ल. ना. चापेकर यांनी प्रकाशित केले आहे.

मराठी भाषेचे शुद्धीकरण या विषयाकडे प्रथम लक्ष वेधले ते वि.दा. सावरकर यांनी. एप्रिल 1925 मध्ये त्यांनी ‘केसरी’त पाच लेख लिहिले.सावरकरांच्या दृष्टीने या प्रकारात माधवराव पटवर्धन विशेष अपराधी होते. कारण त्यांनी काव्यात अनेक फार्सी शब्द आणले होते. याला उत्तर म्हणून माधवरावांनी ‘विविध ज्ञान विस्तार’ मासिकात ऑक्टोबर 1925मध्ये ‘मराठीवरील भयंकर संकट’ नावाचा लेख लिहिला आणि आपली भाषाविषयक भूमिका स्पष्ट केली. माधवरावांनी फार्सी भाषेची भीती वाटत नव्हती. कारण फार्सी शब्द मराठीत घुसले असले तरी फारच थोडे प्रचलित (सुमारे चाळीस एक ) होते. त्यामुळे मराठीतील प्रतिशब्द ते नामशेष करून शकले नाहीत. त्यांना खरी भीती वाटत होती ती इंग्रजी शब्दांची. कारण ते गुप्तपणे मराठीतील शब्दसंपत्ती खाऊन टाकतील अशी शंका त्यांना ग्रासत होती. तसेच अगणित इंग्रजी शब्द घुसत आहेत, त्यांची संख्या वाढली जाईल अशी त्यांनी शंभर वर्षांपूर्वी व्यक्त केलेली अटकळ आज किती खरी झाली आहे ते आपण सर्व क्षेत्रांत पाहत आहोत.

माधवरावांनी सूक्ष्मपणे अभ्यास केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, कित्येक फार्सी शब्दांनी मूळ मराठी शब्दांना नाहीसे केले आहे. इतर शब्द मराठीत घेतल्याने मूळचे शब्द जर निष्कारण नाहीसे होत असतील तर शब्द संपत्तीत पडणारी भर भ्रामकच असते. म्हणून त्यांनी त्या वेळेपासून फार्सी शब्दांवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

भाषेचे ऐक्य हे ध्येय माधवरावांप्रमाणे सावरकरांचेही आहे. मात्र त्यांचे मार्ग भिन्न होते. या पुस्तकातील एकूण विवेचनामधून माधवरावांचे विचार स्पष्ट आणि दूरदृष्टीचे होते हे लक्षात येते. ते अमराठी भाषांचा द्वेष करीत नव्हते. त्यांना वाटत होते, मराठी लोकांनी त्या भाषांचा अभ्यास करावा, ग्रंथांची भाषांतरे करावी आणि शक्य असल्यास मराठी ग्रंथांची भाषांतरे अमराठी भाषांमध्ये करावीत. त्यांना राग होता तो स्वाभिमानशून्य परधार्जिण्या मनोवृत्तीचा.

भाषाशुद्धीची आपली चळवळ धर्मवेडावर उभारलेली नाही हे ते आवर्जून सांगतात. त्याचबरोबर परकीय शब्दांचा स्वीकार हा मराठी शब्दांच्या नाशाला कारणीभूत होतो असा अनुभव आहे म्हणून त्यांना परकीय शब्द नको होते. ही चळवळ अल्पसंख्य अरबी, फार्सी शब्दांच्या विरुद्ध चालविण्यापेक्षा बहुसंख्य इंग्रजीविरुद्ध चालविण्यात यावी असा त्यांचा आग्रह होता. दुसरे, भाषाशुद्धीच्या चळवळीला परकीयांच्या द्वेषापेक्षा स्वकीयांच्या प्रेमाला प्राधान्य दिले पाहिजे आणि भाषाशुद्धीच्या चर्चेत दृष्टी केवळ भाषिक असावी असे त्यांचे म्हणणे होते. त्याचबरोबर इंग्रजी शब्द का वापरायचे नाहीत, तर त्यामुळे मराठी शब्दांचा विसर पडतो आणि नवीन मराठी शब्द निर्माण करण्याची संधी नाहीशी होते. हा विचार त्यांनी पुस्तकात अनेकदा ठळकपणे मांडला आहे.

आपली भाषाशुद्धीची भूमिका मांडताना माधवराव सांगतात की, भाषाशुद्धीवादी इंग्रजीचा वा फार्सीचा द्वेष करीत नाहीत. ते स्वभाषेवर मात्र अधिक प्रेम करतात. शब्दसंकरापासून कोणतीही भाषा अलिप्त राहू शकत नाही, परंतु परभाषेतील शब्दांची कुरघोडी आपण आपल्या विपर्यस्त नि अभिमानशून्य मनोवृत्तीमुळे करून घेत आहोत. तिच्या ओझ्याखाली कित्येक मराठी शब्द व वाक्प्रचार मेले आहेत, कित्येकांचा जीव जात आहे, हा त्यांचा मराठी भाषाप्रेमी म्हणून खरा आक्षेप आहे.
एकूण भाषाशुद्धी प्रकरणी माधवरावांची आणि सावरकरांची दृष्टी भिन्न होती. सावरकरांची दृष्टी स्वधर्माभिनिवेशाची आहे, तर माधवरावांची स्वाभिमानी स्वभाषासमुन्नतेची आहे. मराठी भाषेतील शब्दसंपत्तीला जपणे हे मराठी लोकांचे आद्य कर्तव्य आहे, हे ते सतत सांगतात. शंभर वर्षापूर्वी मराठी लेखन आणि व्यवहारात मराठी भाषेची काय स्थिती होती, हे या पुस्तकाच्या वाचनातून लक्षात येते.

मराठी भाषेची आज झालेली दुरवस्था तर अधिक भयावह आहे हे आपण सगळे मराठीप्रेमी जाणतो. माधवराव पटवर्धनांनी शंभर वर्षांपूर्वी दिलेले इशारे जर मराठी भाषिकांनी अधिक गांभीर्याने घेतले असते तर आज मराठी भाषेची तिची म्हणून संपन्नता अधिक चांगली दिसली असती हे या पुस्तकाच्या वाचनातून मनावर ठसते हेच या पुस्तकाचे यश होय !
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)
[email protected]