
हिंदुस्थानचा कट्टर शत्रू पाकिस्तानने संविधानात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस’ पद निर्मितीसाठी पाकिस्तानात 27 वी घटना दुरुस्ती करण्यात येणार असून याबाबतचे विधेयकही संसदेत सादर करण्यात आले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे टरकलेल्या पाकिस्तानने संविधानात बदल करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे आर्मी चीफ फील्ड मार्शल असीम मुनीर यांना अमर्याद ताकद मिळणार आहे. संसदेत घटनादुरुस्तीसाठी शनिवारी रात्री विधेयकही सादर करण्यात आले आहे. 27 व्या घटना दुरूस्तीनुसार प्रस्तावित बदलांमध्ये संविधानाच्या कलम 243 मध्ये बदल करण्यात येईल. या कलमानुसार आर्मी चीफच्या आणि आर्म्ड फोर्सेसच्या कमांडची नियुक्ती केली जाते.
पाकिस्तानचे कायदा मंत्री आझम नझीर तरार यांनी संसदेचे वरिष्ठ सभागृह सिनेटमध्ये हे विधेयक सादर केले आहे. या प्रस्तावामध्ये 49 कलमे असून पाच प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. सिनेटचे अध्यक्ष युसूफ रझा गिलानी यांनी हे विधेयक पुनरावलोकनासाठी कायदा आणि न्याय समित्यांकडे पाठवले आहे.
हिंदुस्थानची केली कॉपी
पाकिस्तानच्या सीडीएफचा मसुदा हा हिंदुस्थानच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ मसुद्याची कॉपी आहे. पाकिस्तानने संविधानाच्या कलम 243 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मंडला असून लष्कर प्रमुखांना आता चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस हे पद मिळेल. याचा अर्थ तिन्ही सशस्त्र दलांवर त्यांचे नियंत्रण असेल. यामुळे असीम मुनीर यांना अमर्याद ताकद मिळणार असून पाकिस्तानचा इतिहास पाहता ते सत्तांतरही घडवून आणू शकतात. दरम्यान, नवीन बदलांनुसार फील्ड मार्शल ही बदमी आयुष्यभर कायम ठेवण्याचा प्रस्ताव आहे. याचा अर्थ फील्ड मार्शल नेहमीच त्यांचा गणवेश परिधान करू शकतील आणि फक्त महाभियोगाद्वारेच त्यांना काढून टाकता येईल.
विरोधी पक्षाचा आक्षेप
पाकिस्तानमधील प्रमुख विरोधी पक्ष तहरीक-ए-इन्स्फानने यावर आक्षेप घेतला आहे. हा मसुदा वाचण्यासाठी वेळ दिला नाही, असे पीटीआयने म्हटले. विरोधकांना विधेयकाचा मसुदा वाचण्याची संधी मिळालेली नाही. सरकार याबाबत घाई करत असल्याचा आरोप पीटीआयचे नेते अली जाफर यांनी केला.


























































