SIR मतचोरी लपवण्याची संस्थात्मक व्यवस्था, माझ्याकडे पुरावे आहेत! – राहुल गांधी

निवडणूक आयोगाच्या संगनमताने भारतीय जनता पक्षाने केलेल्या मतचोरीविरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रान उठवले आहे. राहुल गांधी सातत्याने पत्रकार परिषद घेत पुराव्यांचे बॉम्ब टाकत आहेत. मतचोरी, बोगस मतदारांबाबत राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून आता त्यांनी एसआयआर ही मतचोरी लपवण्याची संस्थात्मक व्यवस्था असल्याचा आरोप केला आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात भाग घेण्यासाठी आलेले असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत विधान केले.

मध्य प्रदेशमधील नर्मदापूरम येथील पचमढी येथे बोलताना राहुल गांधी यांनी मतचोरीवरून निवडणूक आयोग आणि भाजपवर हल्ला चढवला. भाजपने हरयाणाप्रमाणे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीगडमधील निवडणुकीत मतचोरी केली. मतचोरी हा मोठा मुद्दा असून आता एसआयआर ही मतचोरी लपवण्याची संस्थात्मक व्यवस्था असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

मतचोरी झाल्याचे स्पष्ट असून 25 लाख मतांची चोरी करण्यात आली. प्रत्येक आठ मतांमागे एक मत चोरी करण्यात आले. सर्व आकडेवारीची पडताळणी केल्यानंतर हे स्पष्ट झाले की हरयाणाप्रमाणेच मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्येही मतचोरी करण्यात आली. भाजप आणि निवडणूक आयोगाने ही मतचोरीची व्यवस्था बनवली आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

आमच्याकडे मतचोरीचे आणखी पुरावे असून लवकरच ते जगजाहीर केले जातील. मुख्य मुद्दा मतचोरीचा असून एसआयर मतचोरी लपवण्याची संस्थात्मक व्यवस्था आहे. लोकशाही आणि संविधानावर हल्ला होत आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि ज्ञानेश कुमार यांच्याकडून हा हल्ला होत असून यामुळे भारत मातेचे नुकसान होत आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

कोलकात्यात ममता बॅनर्जींचा अतिविराट मोर्चा, एसआयआरविरोधात पश्चिम बंगाल रस्त्यावर