
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरीही मुंबईतील मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न आजही कायम आहे. माहीमच्या मराठी शाळेवर मुंबई महानगरपालिकेने बुलडोझर चालवण्याचा डाव रचला आहे. शाळेची इमारत धोकादायक असल्याचे कारण सांगून ती पाडली जाणार आहे. शिवसेना आणि मराठीप्रेमींनी त्याला कडाडून विरोध केला आहे.
माहीम रेल्वे स्थानकापासून जवळच असलेली ही न्यू माहीम शाळा मुंबई पब्लिक स्कूल नावाने चालते. शाळेच्या इमारतीमध्ये न्यू माहीम शाळा आणि मोरी रोड शाळा अशा दोन शाळांचे वर्ग चालतात. त्यात मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड माध्यमातून शिक्षण दिले जाते. सुमारे दीड हजार विद्यार्थी तिथे शिकतात. चार वर्षांपूर्वी या इमारतीच्या नूतनीकरणासाठी महापालिकेने पाच कोटी रुपयांचा खर्च केला होता. नंतर ही इमारत धोकादायक ठरवून पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु पालकवर्ग आणि स्थानिक नागरिकांनी त्याला तीव्र विरोध केला होता.
स्थानिक नागरिकांकडून विरोध झाल्यानंतर महानगरपालिकेने या इमारतीचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट केले. या इमारतीची दुरुस्ती करून वापर करता येईल, असा ऑडिटचा अहवाल आहे. तरीसुद्धा शाळेची इमारत पाडण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. कोणत्याही परिस्थितीत शाळेची इमारत पाडू देणार नाही, असा इशारा देत आज स्थानिकांनी तसेच मराठी भाषाप्रेमींनी जोरदार आंदोलन केले.
स्थानिक नागरिकांसह मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार, अभिनेत्री चिन्मयी सुमीत, शिक्षण अभ्यासक गिरीश सामंत, आम आदमी पक्षाच्या प्रणाली राऊत, आविष्कार नाट्यसंस्थेचे दीपक राजाध्यक्ष, नाटककार शफाअत खान, आर्थिक विषयांवरचे तज्ञ संजीव चांदोरकर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी आज ही शाळा वाचवण्यासाठी आंदोलन केले. गिरण्या आजारी पाडून त्यांच्या जमिनी हडपल्या गेल्या, त्याच पद्धतीने मुंबईतील मराठी शाळांनाही लक्ष्य केले जात आहे. शाळांच्या इमारतींना धोकादायक ठरवून स्ट्रक्चरल ऑडिटच्या माध्यमातून त्या बंद करायच्या आणि सर्व भूखंड हस्तगत करून तिथे टॉवर्स उभारायचे असा हा डाव असल्याचा आरोप यावेळी डॉ. पवार यांनी केला. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या शाळेचे पाडकाम थांबवण्याची घोषणा दोन दिवसांत करावी अशी मागणी आंदोलकांनी केली.
माहीमच्या मोरी रोडवरील महापालिकेची शाळा अशाच प्रकारे धोकादायक आहे असे सांगून पाडली गेली आणि तिथल्या विद्यार्थ्यांचे विस्थापन केले गेले. त्यानंतर साडेतीन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी तिथे नव्या इमारतीची एक वीटही रचली गेलेली नाही. अशा वेळी पुन्हा दुसरी शाळा पाडण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत.
माहीमकरांना शब्द देतो, शाळेची घंटा पुन्हा वाजणार
शिवसेनेने ही मराठी शाळा वाचवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. माहीममधील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी ही शाळा सोयिस्कर ठरते. महानगरपालिकेने शाळेची इमारत जीर्ण झाल्याचे सांगून ती पाडण्याच्या हालचाली केल्यानंतर विद्यमान शिवसेना आमदार महेश सावंत यांनी विधिमंडळ अधिवेशनात तो मुद्दा प्रभावीपणे मांडून नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा हट्ट धरला होता. उद्या महानगरपालिका अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. न्यू माहीम स्कूल शाळा पाडू देणार नाही, शाळेची घंटा पुन्हा वाजणार, असा शब्द त्यांनी माहीमकरांना दिला आहे.



























































