‘विषारी’ दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; आयएसच्या तीन दहशतवाद्यांना अटक

देशातील विविध शहरांमध्ये हल्ला करण्याचा ‘आयएस’चा मोठा कट उधळण्यात आला आहे. गुजरात एटीएसने अहमदाबादच्या अडालज येथून संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिघांपैकी एक जण चीनमधून डॉक्टर झाला आहे. तो अतिशय घातक विषाचा वापर करून दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत होता.

गुजरात एटीएसचे प्रमुख सुनील जोशी यांनी याबाबत माहिती दिली. डॉ. अहमद मोहियुद्दीन सैयद, आझाद सुलेमान शेख आणि मोहम्मद सुहैल मोहम्मद सलीम अशी या दहशतवाद्यांची नवे आहेत. त्यांनी दिल्लीसह लखनौ आणि अहमदाबाद या शहरांमध्ये काही ठिकाणांची रेकी केली होती. गुजरात एटीएस या दहशतवाद्यांवर काही दिवसांपासून नजर ठेवून होती. ठोस माहिती हाती आल्यानंतर रविवारी सकाळी त्यांना अटक करण्यात आली. तिघेही उत्तर प्रदेशातून गुजरातमध्ये आले होते, अशी माहिती जोशी यांनी दिली.

कशापासून बनविले विषारी अस्त्र?

या दहशतवाद्यांना पाकिस्तानातील हॅण्डलरकडून ड्रोनद्वारे शस्त्रे पाठविण्यात आली होती. ते गोळा करण्यासाठीच दहशतवादी गुजरातमध्ये गेले होते. सैयद उच्चशिक्षित असून तो चीनमधून डॉक्टर झाला आहे. त्याच्याकडून शस्त्रांशिवाय एरंडाच्या बियांपासून बनविलेले घातक असे ‘रिसीन’ नावाचे विषारी रसायन जप्त करण्यात आले आहे. त्याने या विषावर संशोधन सुरू केले होते. त्यासाठी आवश्यक सामग्रीदेखील गोळा केली होती.