
मतचोरीच्या मुद्द्यावरून देशातील वातावरण ढवळून निघाले असतानाच राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी आज खळबळजनक गौप्यस्फोट केला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाआधी हरयाणातून तब्बल चार स्पेशल ट्रेन सुमारे सहा हजार लोकांना घेऊन बिहारमध्ये वेगवेगळय़ा ठिकाणी पोहोचल्या, असा आरोप त्यांनी केला. हे खरेखुरे मतदार होते की सुनियोजित प्लॅनचा भाग होता, असा सवाल सिब्बल यांनी केला.
पत्रकार परिषद घेऊन सिब्बल यांनी माहिती दिली. ‘3 नोव्हेंबर रोजी चार विशेष रेल्वे गाडय़ा सुमारे सहा हजार लोकांना घेऊन हरयाणाहून बिहारला रवाना झाल्या. यातील पहिल्या दोन गाडय़ा कर्नालहून निघून पानिपतमार्गे बरौनीला पोहोचल्या. दुसऱ्या दोन गाडय़ा गुरुग्रामहून सुटून पाटणामार्गे भागलपूरला गेल्या,’ असे त्यांनी सांगितले. ही माहिती देताना सिब्बल यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना घेरले. खऱ्याखुऱ्या मतदारांना स्पेशल ट्रेनची गरज लागत नाही, मग ही व्यवस्था कोणत्या खास कारणासाठी केली गेली, अशी विचारणा सिब्बल यांनी केली. निवडणूक आयोग काही करणार नाही हे आम्हाला माहीत आहे. ते भाजपचे साथीदार आहेत. ते कशाला काय करतील? असेही सिब्बल म्हणाले.
सिब्बल यांचे रेल्वेमंत्र्यांना प्रश्न
इतक्या मोठय़ा संख्येने लोक कोणत्या प्रवासाला निघाले होते?
त्यांना नेणाऱ्या गाडय़ा स्पेशल ट्रेन म्हणून का चालवल्या गेल्या?
हरयाणातूनच या गाडय़ा का सोडण्यात आल्या?
स्पेशल ट्रेन सोडायच्याच होत्या तर छठ पूजेच्या काळात का सोडल्या नाहीत?
हे लोक बिहारमध्ये नेमके कोणकोणत्या ठिकाणी उतरले?
स्पेशल ट्रेन्सचा हा खर्च कोणी केला?
हा खर्च सरकारने केला नसेल तर बुकिंग कोणत्या राजकीय पक्षाने केली?



























































