प्रत्येकाच्या खात्यात 2 हजार डॉलर टाकणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

टॅरिफवरून स्वदेशातही टीकेचे धनी झालेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता अमेरिकी जनतेला खूष करणारी घोषणा केली आहे. अमेरिकेतील प्रत्येक गरीब नागरिकाच्या खात्यात 2 हजार डॉलर म्हणजेच सुमारे पावणे दोन लाख रुपये टाकणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

‘टथ सोशल’ या स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांनी एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी सरकारच्या टॅरिफ धोरणाची जोरदार पाठराखण केली आहे.

टॅरिफ धोरणाला विरोध करणारे मूर्ख आहेत. आमच्या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेला जगात सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक प्रतिष्ठत देश बनवले आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला.

टॅरिफमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. गुंतवणुकीचा ओघ वाढला असून देशात मोठय़ा प्रमाणात कारखाने सुरू होत आहेत. अब्जावधी डॉलर्सचा महसूल देशाला मिळत आहे. सर्व काही उत्तम सुरू असल्यामुळे लवकरच देशातील प्रत्येक गरीबाच्या खात्यात 2 हजार डॉलर टाकले जातील, असे ते म्हणाले. मात्र हे पैसे कधी टाकले जाणार आणि त्याचे निकष काय असणार याविषयी त्यांनी अधिक माहिती दिली नाही.