
कोरेगाव पार्क मुंढवा येथील पार्थ पवार जमीन प्रकरणाची फाईल मी महसूलमंत्री असताना दोन-तीन वेळा माझ्याकडे आली होती. ती उच्च न्यायालयातही जाऊन आली; पण मी योग्य निर्णय घेऊन ती नाकारली होती, असा गौप्यस्फोट माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
पार्थ पवार जमीन खरेदीप्रकरणी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संगमनेर येथे बाळासाहेब थोरात यांच्याशी संवाद साधला. तेव्हा ते बोलत होते. थोरात म्हणाले, कोणीही महसूलमंत्री झाले तरी महाराष्ट्रातले विषय परत परत त्यांच्याकडे येत असतात. विशेषत- अनेक मंडळी सरकारी जमीन लाटण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा आपणच रखवालदार असल्याने काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. तसाच निर्णय महसूलमंत्री असताना घेतला होता. मी घेतलेले निर्णय उच्च व सर्वोच्च न्यायालयात कायम राहिले आहेत. कोरेगाव पार्क मुंढवा जमीन प्रकरणाची फाईल दोन-तीन वेळा माझ्याकडे आली होती. मात्र, योग्य निर्णय घेऊन मी ती नाकारत होतो.
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असताना एवढी महत्त्वाची जागा अशाप्रकारे दिली जाते हे आश्चर्यकारक आणि अत्यंत दुर्दैवी आहे. जनतेचे प्रतिनिधी म्हणून निर्णय घेताना काळजी घेणे आवश्यक आहे. सत्ताधारी असला तरी धाक असला पाहिजे, तो काँग्रेसने कायम पाळला. आता भाजपची जबाबदारी आहे कसे प्रशासन चालवायचे, अशी भूमिका बाळासाहेब थोरात यांनी मांडली.




























































