
सांगली महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस अत्यंत बिकट बनत चालली आहे. महापालिका क्षेत्रात जवळपास 25 हजारांहून अधिक भटकी कुत्री आहेत. या कुत्र्यांना पकडण्यासाठी केवळ दोन डॉग व्हॅन आणि त्यावर दहा कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शाळा, दवाखाने, मैदाने कुत्रीमुक्त कशी होणार, असा सवाल सांगलीकर जनतेतून विचारला जात आहे.
सांगली महापालिका क्षेत्रात अनेक सार्वजनिक ठिकाणी, शहरातील चौकाचौकांत आणि मुख्य रस्त्यांवरही भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी दिसतात. काही दिवसांपूर्वी संजयनगर परिसरामध्ये कुत्र्यांनी एका महिलेच्या घरात घुसून हातापायाचे लचके तोडले होते. रात्री-अपरात्री रस्त्यावर जाणाऱया नागरिक व वाहनचालकांवरही भटकी कुत्री हल्ले करतात. भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. पण, महापालिकेकडे आवश्यक मनुष्यबळ नाही. केवळ एकच पशुवैद्यकीय अधिकारी आहे. सांगली व मिरज या दोन्ही शहरांत मिळून केवळ दोन डॉग व्हॅन आहेत. यावर दहा कर्मचाऱयांची नियुक्ती आहे. दिवसाला एका-दुसऱया कुत्र्यांची नसबंदी होते. म्हणजे वर्षभरात एक हजारपेक्षा कमी कुत्र्यांची नसबंदी केली जाते. एकीकडे कुत्र्यांची वाढती संख्या व नसबंदीचे प्रमाण, यात मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असला, तरी सांगली महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांपासून नागरिकांची मुक्तता होण्याची आशा अत्यंत धुसर आहे.
महापालिकेत भटकी कुत्री सोडू – नितीन शिंदे
सर्वोच्च न्यायालयाने भटकी कुत्रीमुक्त परिसर करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची कडक अंमलबजावणी सांगली महापालिकेने करावी; अन्यथा महापालिका कार्यालयात भटकी कुत्री सोडू, असा इशारा हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला आहे. सांगली महापालिका क्षेत्रामध्ये भटक्या कुत्र्यांनी, जनावरांनी अक्षरश- धुमाकूळ घातला आहे. हजारोंच्या संख्येने असणाऱया भटक्या कुत्र्यांनी वृद्ध महिला, वाहनचालक व बालकांवर हल्ले केले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने भटकी कुत्रीमुक्त परिसर करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत आयुक्तांना निवेदन दिले आहे. महापालिकेने तातडीने न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.




























































