
ठाणे महापालिकेचे नवीन लेखा वित्त अधिकारी म्हणून शासनाने दीपक शिंदे यांची नियुक्ती केली खरी. मात्र पदभार स्वीकारल्यानंतर नवीन लेखा वित्त अधिकारी झालेले शिंदे दुसऱ्या दिवसापासून पालिका मुख्यालयात फिरकलेच नसल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे दीपक शिंदे कार्यालयात येत नसल्याने त्यांच्या गैरहजेरीत जुनेच कॅफो दिलीप सूर्यवंशी हे सध्या बिलांवर सह्या करत असल्याने पालिकेच्या वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे. सूर्यवंशी हे पाच वर्षांहून अधिक काळ या विभागात काम करत आहेत.
ठाणे महापालिकेचा लेखा आणि वित्त विभाग अतिशय महत्त्वाचा विभाग असून पालिका क्षेत्रात झालेल्या कामांचे बिल याच विभागाच्या मार्फत काढली जातात. त्यामुळे या महत्त्वाच्या पदावर वर्णी लागावी यासाठी अनेक अधिकाऱ्यांचे प्रयत्न असतात. पालिकेच्या लेखा आणि वित्त अधिकारी पदी पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही दिलीप सूर्यवंशी हे या पदावर रुजू होते. त्यांचा कालावधी उलटूनही त्यांची बदली का करण्यात येत नाही याबाबत अनेकवेळा चर्चा रंगली होती. अखेर पालिका निवडणुकीपूर्वी सूर्यवंशी यांच्या जागी दीपक शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 27 ऑक्टोबरला दीपक शिंदे यांच्या नियुक्तीची ऑर्डर शासनाने काढली. त्यानंतर ते या पदावर रुजू होण्यासाठी ठाणे महापालिकेतही आले. मात्र त्यानंतर शिंदे पुन्हा पालिकेत फिरकलेच नाहीत. त्यामुळे सध्या बिलांवर जुनेच लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी सह्या करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सूर्यवंशी यांचा निरोप समारंभ झाला…
दीपक शिंदे यांनी 28 ऑक्टोबरला पालिकेत हजेरी लावत पदभार स्वीकारला. स्वागताचे हारतुरेही स्वीकारले. त्याचवेळी जुने कॅफो सूर्यवंशी यांचादेखील निरोप समारंभ पार पडला. मात्र दुसऱ्या दिवसापासून शिंदे कार्यालयात न फिरकल्याने पालिका वर्तळात चर्चा सरू झाली आहे.



























































