चुकीला माफी नाही! काँग्रेसच्या शिबीरात राहुल गांधींना ’10 पुश अप्स’ची शिक्षा, कारण जाणून घ्या…

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशमधील पचमढी येथे आयोजित काँग्रेसच्या शिबीराला हजेरी लावली. या शिबीराला उशीरा पोहोचल्याने त्यांना शिक्षा देण्यात आली. राहुल गांधी यांना 10 पुश अप्स मारण्यास सांगण्यात आले आणि त्यांनीही ही शिक्षा हसत स्वीकारली.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव यांनी शिबीरात उशीरा येणाऱ्यांसाठी अनोखी शिक्षेचा नियम ठेवला होता. वेळेचे महत्त्व कळावे म्हणून शिबीराला उशीरा येणाऱ्या 10 पुश अप्सची शिक्षा दिली जात होती. विशेष म्हणजे या शिबीराला राहुल गांधी 20 मिनिटे उशीरा पोहोचले आणि त्यामुळे त्यांनाही या शिक्षेचे पालन करावे लागले.

पक्षशिस्त राहुल गांधी यांच्यासाठी नवीन नाही. आम्हीही आमच्या शिबीरात शिस्तीचे कठोरपणे पालन करतो. पक्षात लोकशाही असून सर्व सदस्यांना समान वागवले जाते. भाजपप्रमाणे बॉसगिरी आमच्या पक्षात नाही, असे मध्य प्रदेश काँग्रेसचे मिडिया समन्वयक अभिनव बरोलिया यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. या शिबीरात सहभागी झाल्यानंतर राहुल गांधी प्रचारासाठी बिहारला रवाना झाल्याचेही त्यांनी सांगितले.

निवडणूक आयोगावर हल्लाबोल

यावेळी माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्ला चढवला. मतचोरी झाल्याचे स्पष्ट असून 25 लाख मतांची चोरी करण्यात आली. प्रत्येक आठ मतांमागे एक मत चोरी करण्यात आले. सर्व आकडेवारीची पडताळणी केल्यानंतर हे स्पष्ट झाले की हरयाणाप्रमाणेच मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्येही मतचोरी करण्यात आली. भाजप आणि निवडणूक आयोगाने ही मतचोरीची व्यवस्था बनवल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.