
राष्ट्रवादीची औलाद अशी आहे की, ती सत्तेशिवाय राहूच शकत नाही, असे बेताल वक्तव्य आज वाचाळपणासाठी प्रसिद्ध असलेले माजी मंत्री तानाजी सावंत यांनी केले. या भयंकर वक्तव्यामुळे स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीत लाथाळ्या होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्राला भिकारी करेन पण मी भिकारी होणार नाही. खेकड्याने धरण फोडले तसेच महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी दीडशे बैठका घेतल्याचे सांगणारे मिंधे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडणार आहे.
एका कार्यक्रमात त्यांनी मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. युतीचे तत्त्व माहीत नाही तर कशासाठी युती करता. दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत मी सांगत होतो, अशा शब्दात त्यांनी राष्टवादी काँग्रेसवरत्तोंडसुख घेतले.
ते म्हणाले की, ‘राष्ट्रवादीची औलाद अशी आहे की सत्तेशिवाय राहू शकत नाही. पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर कसे होते तसे यांचे होते. याचा प्रत्यय तुम्हाला गेल्या महिनाभरात आला असेल. कुणाला पटो अगर न पटो माझी मतं आहेत ती आहेत,’ असे ते म्हणाले. त्याचबरोबर गरज नसताना तुम्ही त्याला का घेतले असे म्हणत माजी आमदार राहुल मोटे यांना अजित पवारांनी प्रवेश दिल्याने सावंत चांगलेच संतापले. त्यांनी हिंदुत्व स्वीकारलं का? युतीची ध्येय धोरणे त्यांना मान्य आहेत का? मग का यांना आमच्यावर लादता? याची गरज होती का? गरज नसताना तुम्ही त्याला सोबत घेतले, ते आम्हाला मान्य नाही, असेही ते म्हणाले.
मित्रपक्षांसह दरम्यान, सावंत यांना घेरण्यासाठी विरोधकही एकवटले आहेत. राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेमुळे अजित पवारांचा आक्रमक झाला पक्षही आहे.
तानाजी सावंत यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांची रणनीतीसाठी बैठक झाल्याचीही चर्चा आहे. त्यानंतर सावंतांनीही एकला चलो रे चा नारा दिला आहे.


























































