अमोल मिटकरी, रूपाली ठोंबरे यांची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी; अजित पवार गटाकडून 17 जणांची नवी यादी

सोशल मिडियावरील वादग्रस्त भूमिकांनी पक्षाला अडचणीत आणणारे आमदार अमोल मिटकरी तसेच फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्ये प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना लक्ष्य करणाऱ्या रुपाली ठोंबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पक्षाच्या प्रदेश प्रवत्ते पदावरून उचलबांगडी केली आहे. आज पक्षाने 17 नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने आज यापूर्वी घोषित केलेली प्रवक्त्यांनी यादी रद्द करून नवीन यादी जारी केली. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले सूरज चव्हाण यांना प्रवत्ते पदाची बक्षिसी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या नव्या प्रवक्त्यांच्या यादीत आमदार अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक, हेमलता पाटील, राजीव साबळे, सायली दळवी, रुपाली चाकणकर, आनंद परांजपे, राजलक्ष्मी भोसले, प्रतिभा शिंदे, प्रशांत पवार, शशिकांत तरंगे, ब्रिजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, विकास पासलकर, श्याम सनेर यांचा समावेश आहे.