
डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानीच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने रणजी करंडकाच्या सामन्यात हिमाचल प्रदेशवर डाव आणि 120 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह मुंबईने हंगामातील दुसरा डावाने विजय नोंदवत बोनस गुणासह सात गुणांची कमाई केली.
मुंबईने पहिल्या डावात 446 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात हिमाचलचा पहिला डाव केवळ 187 धावांवर गुंडाळला गेला. त्यामुळे मुंबईला 259 धावांची भक्कम आघाडी मिळाली. तिसऱया दिवसाच्या खेळाची सुरुवात हिमाचलने 7 बाद 94 अशा कठीण स्थितीत केली. तळाच्या फळीतून वैभव अरोराने झुंजार 51 धावा ठोकत थोडा प्रतिकार केला. त्याने निखिल गंगटा (नाबाद 64) सोबत नवव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली, मात्र हा प्रयत्न संघाला फॉलोऑनपासून वाचवू शकला नाही.
मुलानीचा ‘मॅजिक स्पेल’
फॉलोऑननंतर हिमाचलचा दुसरा डावही फार काळ टिकू शकला नाही. मुलानीच्या फिरकीसमोर त्यांचे फलंदाज अक्षरशः गोंधळले. त्याने 37 धावांत 5 विकेट घेत विजयाचा पाया रोवला, तर मुशीर खानने 23 धावांत 2 विकेट बाद करून साथ दिली. अखेर हिमाचल दुसऱया डावातही 139 धावांवर आटोपला आणि मुंबईत डावाचा मोठा विजय संपादला.



























































