
दिवाळी झाली आणि खरीप हंगामाची कामेही अंतिम टप्प्यात आहेत. मोखाड्यात शेती व्यतिरिक्त दुसरे कुठलेही रोजगाराचे साधन नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (रोहयो) हीच मजुरांच्या हात कामाला देणारी एकमेव सरकारी योजना आहे. मात्र मोखाडा तालुक्यात सरकारी यंत्रणांनी तुटपुंजी कामे सुरू केल्याने आदिवासींच्या हाताला काम नाही. त्यामुळे रोजगारासाठी ‘सोडून जातो गाव रे’ असे म्हणत हजारो मजुरांचे तांडे शहराकडे निघाले आहेत. त्यामुळे गावे ओस पडू लागली आहेत.
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात खरीप हंगामाचे पीक हेच एकमेव रोजगाराचे साधन आहे. या व्यतिरिक्त शासनाची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना ही एकमेव शाश्वत रोजगार देणारी योजना आहे. प्रतिवर्षी याच योजनेवर बेरोजगार आदिवासी मजुरांना, रोजगारासाठी अवलंबून राहावे लागते. यंदा ओल्या दुष्काळामुळे खरीप पिकाची माती झाली. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर हतबल झाले.
34 हजारांपैकी केवळ 1129 मजुरांना काम
मोखाडा तालुक्यात 33 हजार 844 कुटुंबांतील 73 हजार 463 जॉबकार्ड धारक मजूर संख्या आहे. सरकारी आकडा 34 हजार 245 मजुरांचा आहे. दरवर्षी 2 ऑक्टोबर महात्मा गांधींच्या जयंती दिनाला रोजगार हमी योजना सुरू होते. मात्र सरकारी यंत्रणांच्या कामचुकार धोरणामुळे सवा महिन्याच्या कालावधीत केवळ 1129 मजुरांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे हजारो बेरोजगार मजुरांनी स्थलांतराचा मार्ग अवलंबला आहे.
काम करून सहा महिने झाले तरी मजुरी नाही
कृषी खात्याचे खात्रीचे काम आठवडाभर केले आहे. काम करून सहा महिने झाले आहेत. मात्र या कामाची मजुरी अजूनही मिळालेली नाही. काम करून वेळेत मजुरी मिळत नाही, मग जगायचे कसे? वेळेत मजुरी मिळत नाही म्हणून आम्ही रोजगार हमी योजनेच्या कामांवर जात नाही. मिळेल ते काम येथे करतो. नाहीतर शहराकडे कामाला जातो, अशी अगतिकता खोडाळा येथील मजूर प्रमोद हमरे यांनी व्यक्त केली.





























































