सत्तेसाठी तीन साप एकत्र येऊन एकमेकांना गिळू पाहताहेत, जनतेकडे कोण पाहणार… उद्धव ठाकरे यांनी फटकारले

गोपीनाथ मुंडे असताना आपण बीडला झुकते माप दिले होते, पण आता बीडची विल्हेवाट लागली आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच सत्तेसाठी तीन साप एकत्र येऊन एकमेकांना गिळू पाहताहेत, जनतेकडे कोण पाहणार अशा शब्दांत त्यांनी महायुतीला फटकारले.

आज कुंडलिक खाडे यांनी मातोश्रीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश घेतला. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, चूक झाली तर समजू शकतो पण अपराध होता कामा नये. एखाद्या वेळी रागाच्या भरात किंवा अनावधानाने चुकीचे पाऊल उचललं जाऊ शकतं. पण त्यानंतर लक्षात आल्यावर ती चूक सुधारली गेली पाहिजे. आणि सहाजिक ती चूक सुधारण्याची संधी दिली पाहिजे. गेल्या आठवड्यात मी मराठवाडा दौरा केला होता. अंबादास दानवे यांनी अप्रतिम असा दौरा आयोजित केला होता. सध्या महाराष्ट्र आपला कोण याकडे पाहत आहे. कारण तिथे सत्तेसाठी साठमारी सुरू आहे. तीन साप एकत्र आले आहेत त्यांच्या शेपट्या एकमेकांच्या तोंडात आले आहेत. सगळेच एकमेकांना गिळायला बसले आहेत. हे असे प्रकार सुरू झाल्यानंतर जनतेकडे कोण बघणार? आणि शेतकरी तर हताश झालेला आहे. त्याला नुकसानभरपाई काहीच मिळत नाहिये. त्यांना न्याय आपण मिळवून दिला पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच ही लढाई ही आता फक्त शिवसेनेपुरती नाही. शिवसेना ही मराठीसाठी, हिंदुंसाठी आणि महाराष्ट्रासाठी शिवसेनाप्रमुखांनी स्थापन केली होती. तोच हेत गद्दार विसरले आहेत आणि सत्तेसाठी वाट्टेल ते करायला तयार झाले आहेत. गोपीनाथ मुंडे असताना आपण बीडला झुकते माप दिले होते. पण आता बीडची विल्हेवाट लागली आहे. तिथे कुणीच कुणाचं नाहिये. अशा वेळी सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभं राहणं आपलं कर्तव्य आहे. शिवसेना मला पूर्वीपेक्षा वैभवशाली पाहिजे, याचा अर्थ जनता आपल्यासोबत आली पाहिजे. ही जनता कुंडलिक खाडे आपल्यासोबत आणल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.