सामना अग्रलेख – दिल्ली हादरली; गृहमंत्र्यांचे अपयश

स्वतःला सरदार पटेल यांच्या रूपात पाहणारे अमित शहा हे आतापर्यंतचे सगळ्यात कमजोर आणि बकवास गृहमंत्री आहेत. त्यांच्या डोळ्यांसमोर 26 महिलांचे कुंकू पुसले जाते, त्यांच्या नाकासमोर स्फोट घडवून लाल किल्ला हादरवला जातो आणि गृहमंत्री त्यांचे पंचरंगी उपरणे खांद्यावर टाकून बैठकाच घेत आहेत. दहशतवादाचा बीमोड करण्यात आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देण्यात मोदीशहांचे सरकार अपयशी ठरले आहे. त्यांनी राजीनामा दिला तर 140 कोटी जनतेवर उपकार ठरतील, नाहीतर कधी दिल्ली, कधी मुंबई, कधी बंगळुरूसारखी शहरे रक्ताने लथपथ होऊन तडफडताना दिसतील. भाजपवाल्यांनो, भारतमातेचे खरे भक्त असाल तर गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा मागा. तीच देशसेवा ठरेल!

दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरली आहे. ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी हे राष्ट्राला उद्देशून भाषण देतात, दहशतवादाचा बीमोड करण्याचे आश्वासन देतात, त्याच लाल किल्ला परिसरात दहशतवाद्यांनी बॉम्ब फोडले. दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरली असताना पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ बिहार निवडणुकांच्या प्रचारात दंग होते. पंतप्रधान तर भूतानला पोहोचले. भूतानमधून त्यांनी इशारा दिला, ‘‘कुणालाही सोडणार नाही.’’  स्फोटात आतापर्यंत बारा जण ठार झाले. पंचवीस नागरिक जखमी झाले. दिल्लीच्या रस्त्यावर किडय़ामुंग्यांसारखी माणसे मारली जात आहेत व सरकार बिहारातील निवडणुकांत दंग आहे. दहशतवाद हा जागतिक चिंतेचा विषय आहे. भारतात तो राजकीय विषय बनला आहे. प्रत्येक दहशतवादी हल्ल्याचे राजकारण करायचे, प्रत्येक हल्ल्याचा प्रचारात वापर करायचा, हिंदू-मुसलमानांत तेढ निर्माण करून राजकीय भाकऱ्या शेकायच्या हेच उद्योग गेल्या दहा वर्षांत घडले. देशाची राजधानीच सुरक्षित नसेल तर या देशात काय सुरक्षित आहे? जम्मू-कश्मीरात भारतीय पर्यटक सुरक्षित नाहीत. मणिपूरसारख्या राज्यात जनता सुरक्षित नाही. राजधानी दिल्लीत कधीही, कोठेही बॉम्बस्फोट होऊ शकतो. पहलगाम येथे 26 पर्यटकांना मारण्यासाठी दहशतवादी घुसले व महिलांचे कुंकू पुसून निघून गेले तरी गृहखात्यास पत्ता लागला नाही. भारतीय गृहखात्याची ‘इंटेलिजन्स’ यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडल्याचा हा पुरावा आहे. इतका मोठा हल्ला होतो व गुप्तचरांना माहिती मिळत नाही? गुप्तचर खात्याचे राजनीतीकरण झाले आहे. दहशतवाद्यांचा माग काढण्याऐवजी राजकीय विरोधकांचा माग काढण्यासाठीच यंत्रणा बैलाप्रमाणे जुंपली आहे. पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगार अद्याप सापडलेले नाहीत. पुलवामाचे गुन्हेगार मोकाट आहेत. आता दिल्लीतील गुन्हेगार पळून गेले. सरकार हात चोळत बसले आहे. भारताचे सरकार हे

आपल्याच नागरिकांचे बळी

उघडय़ा डोळ्यांनी पाहत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ केले. ‘आता पाकिस्तानवर तिरंगा फडकवून माघारी येऊ. पाकिस्तानला अशी अद्दल घडवू की, पुन्हा पाकडे उठणार नाहीत,’ अशा डरकाळ्या तेव्हा सत्ताधाऱ्यांनी फोडल्या होत्या, पण प्रे. ट्रम्प यांनी व्यापार बंद करण्याची धमकी देताच ‘सिंदूर’ गुंडाळण्यात आले. भारत सरकारने तेव्हा जाहीर केले, ”Any future terror act will be considered act of war against India.” म्हणजे भारतावरील यापुढील कोणताही दहशतवादी हल्ला हे युद्ध मानून कारवाई केली जाईल. हे खरे मानले तर दिल्लीतील लाल किल्ल्यावर झालेला सोमवारचा दहशतवादी हल्ला मोदी सरकार भारताविरुद्धचे युद्ध मानणार आहे काय? या हल्ल्यात दहा निरपराध लोक मारले गेले. हा हल्ला कोणी केला, याचा शोध घेण्याचे काम आता सुरू आहे. तुमचे शोध तुमच्यापाशी ठेवा. दहशतवादी आणि त्यांच्या पाकडय़ा बापजाद्यांचे निर्मूलन आधी करा. दिल्लीतील स्फोटापूर्वी तीन राज्यांतील पोलीस कारवाईत 2900 किलो स्फोटके सापडली. दहशतवादी संघटनांशी संबंधित आठ-दहा लोकांना अटक केली तरीही दिल्लीत स्फोट व्हायचा तो झालाच. आता म्हणे, मुंबईसह प्रमुख शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातच्या मुंद्रा बंदरावर एकाच दिवशी लाखो कोटींचे अमली पदार्थ जप्त होतात. या सगळ्याचे कनेक्शन पाकिस्तान, अफगाणिस्तानशी असल्याचे उघड होते. अहमदाबाद विमानतळावरून उडालेले एअर इंडियाचे विमान दोन सेकंदांत खाली कोसळते. हा अपघात की घातपात, याच्या रहस्याचा पडदा अद्यापि कायम आहे. मोदी व शहांना ठार मारण्याचे कट अधूनमधून उधळले जात असतात, पण हे सर्व लोक अभेद्य सुरक्षेच्या पिंजऱ्यात बसले आहेत व देशातील नागरिक रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी

भयाच्या सावटाखाली

कसाबसा जगतो आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ गजबजलेल्या चांदनी चौकात स्फोट होतो तेव्हा किमान शंभर जणांचे जीव संकटात येतात. पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील स्फोटानंतर संवेदना वगैरे व्यक्त केल्या. गृहमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला, पण निरपराध्यांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी तुमचीच होती. तुम्ही बिहारच्या राजकारणात उखाळय़ापाखाळय़ा काढण्यात दंग राहिलात आणि दहशतवाद्यांनी भारतात शिरकाव केला. सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करू, असे श्री. शहा वारंवार सांगतात. त्यांच्या दृष्टीने विरोधी पक्षांचे नेते हे दहशतवादी आहेत व त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सध्या सुरक्षा यंत्रणांचा वापर केला जात आहे. सोमवारच्या दिल्लीतील स्फोटाचा वापर बिहारमधील मंगळवारी पार पडलेल्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यासाठी केला गेला. देशावर दहशतवादी हल्ला झाल्याची बोंब ठोकली गेली, पण या दहशतवादी हल्ल्यास स्वतः पंतप्रधान व गृहमंत्री जबाबदार आहेत. त्यांना देश सांभाळता येत नाही. त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचे काहीच पडलेले नाही. स्वतःला सरदार पटेल यांच्या रूपात पाहणारे अमित शहा हे आतापर्यंतचे सगळ्यात कमजोर आणि बकवास गृहमंत्री आहेत. त्यांच्या डोळ्यांसमोर 26 महिलांचे कुंकू पुसले जाते, त्यांच्या नाकासमोर स्फोट घडवून लाल किल्ला हादरवला जातो आणि गृहमंत्री त्यांचे पंचरंगी उपरणे खांद्यावर टाकून बैठकाच घेत आहेत. दिल्लीच्या बॉम्बस्फोटाने राष्ट्रासमोर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दहशतवादाचा बीमोड करण्यात आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देण्यात मोदी-शहांचे सरकार अपयशी ठरले आहे. त्यांनी राजीनामा दिला तर 140 कोटी जनतेवर उपकार ठरतील, नाहीतर कधी दिल्ली, कधी मुंबई, कधी बंगळुरूसारखी शहरे रक्ताने लथपथ होऊन तडफडताना दिसतील. भाजपवाल्यांनो, भारतमातेचे खरे भक्त असाल तर गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा मागा. तीच देशसेवा ठरेल!