युनूस सरकारविरोधात ‘जेन झी’ रस्त्यावर, संगीतबंदीमुळे बांगलादेशात उठाव

बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा तरुणाई सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे. मोहम्मद युनूस सरकारने संगीतबंदी करणारा धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे हे आंदोलन सुरू झाले असून त्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी तरुणाईने शेख हसीना यांचे सरकार उलथवून लावले होते. त्यानंतर मोहम्मद युनूस यांचे सरकार स्थापन झाले. या सरकारने घेतलेल्या काही निर्णयांमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने प्राथमिक शाळांमध्ये संगीत आणि पीटी शिक्षकांच्या नियुक्त्या थांबविल्या. त्यामुळे ढाका विद्यापीठातून पुन्हा एकदा सरकारविरोधी आंदोलनाची ठिणगी उडाली आहे. युनूस सरकारने कट्टरपंथीयांच्या दबावाखाली झुकत असे निर्णय घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

संगीतबंदीचा गाणी गाऊन केला निषेध

आंदोलकांनी ढाका विद्यापीठातील अपराजेय बांगला या स्मृतिस्थळाजवळ बॅनर उभारले. शाळांमधील संगीत थांबवू शकता, मात्र लोकांच्या मनातून ते कधीच काढू शकत नाही, असे या बॅनरवर लिहिले आहे.