
<<< मुकुंद ढोबळे >>>
पोरं करती-धरती झालीयेत. आता कधी एकदा त्यांच्या डोईवर अक्षदा पडताहेत, या आतुरतेनं एकीकडं आई-वडिलांचा जीव व्याकुळलाय. तर दुसरीकडे ही पोरंही लग्नाची स्वप्नं रंगवतायेत खरं; पण दुर्दैवानं लाल रक्ताला चटावलेले बिबटे तरुणांच्या या गुलाबी स्वप्नांचाही फडशा पाडताहेत. हे धक्कादायक वास्तव आहे बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असलेल्या शिरूर तालुक्यामधील गावांतील. केवळ बिबट्यांच्या भीतीपोटी मुली देऊन सोयरिक जोडण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला जात असल्याने गावांगावांत शेकडो तरुणांची लग्नं रखडली आहेत.
बिबट्यांनी पुणे जिल्ह्यातील अनेक गावांतील गावकऱ्यांचे जगणे मुश्किल केले आहे. विशेषतः आंबेगाव, शिरूर, जुन्नर, खेड या तालुक्यांत भयावह परिस्थिती आहे. रात्र असो की दिवस; कुठल्या क्षणी अन् कुणीकडून बिबट्या येऊन झडप घालेल, याचा भरवसा नाही. यामुळे इथले ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन जगत आहेत. गावा-शिवारात झुंडीनं फिरणाऱ्या बिबट्यांनी आजवर कैक गुरा-ढोरांबरोबरच लेकरं-माणसांचाही जीव घेतलाय. यामुळे ग्रामीण भागात धडकी भरवणारे वातावरण आहे.
बिबट्यांचा दहशतीचा परिणाम सामाजिक जीवनावरही झाला आहे. गावांतील शेकडो तरुण ‘वेल सेटल’ असूनही त्यांना केवळ बिबट्यांच्या दहशतीमुळे मुली देण्यास नकार दिला जात आहे. सोयरा मिळेना म्हणून या तरुणांचे आई-वडील चिंताग्रस्त आहेत. तर गुलाबी स्वप्नांचा चक्काचूर होत असल्याने तरुणांना निराशेने ग्रासले आहे.
मामाचे गावही नको रे बाबा!
शाळेला उन्हाळा किंवा दिवाळीची सुट्टी लागली रे लागली की बच्चे कंपनी मामाच्या गावाची वाट धरतात. कधी एकदा मामाचा गाव गाठतोय, असं त्यांना होतं. मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे या गावांची भाचे मंडळी मामाचा गाव नको म्हणू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या दिवाळीच्या सुट्टीनिमित्त ही वास्तवता समोर आली.
कोल्हापुरात हायफाय वसाहतीत घुसला बिबट्या
उच्चभ्रू वसाहतीत घुसलेल्या बिबट्याला आज दोन ते तीन तासांच्या थरारक प्रयत्नानंतर जेरबंद करण्यात आले. शहरातील नागाळा पार्क येथील वर्दळीच्या ठिकाणी हॉटेल वुडलॅण्ड आणि महावितरण कार्यालयाच्या आवारात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी पोलीस, वन विभागासह अग्निशमन दलाच्या पथकाला अडीच ते तीन तास लागले. तत्पूर्वी हॉटेलमधील कर्मचारी तुकाराम खोंदल आणि कृष्णात पाटील हे पोलीस बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले, तर जाळी टाकून बिबट्याला पकडताना वन विभागाचे दोन जखमी झाले.


























































