
मुंबई क्रिकेट हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मंत्री आशीष शेलार पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. अध्यक्षपदी अजिंक्य नाईक बिनविरोध निवडून आले असले तरी अन्य 14 जागांसाठी थेट सामना रंगणार आहे. या लढतीत मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे दिग्गजही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे बुधवारी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.
गेले काही दिवस मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक कोर्टातच लढली जात असल्यामुळे अस्थिरतेचे सावट निर्माण झाले होते. मात्र आता ते सावट दूर झाले असून अध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिल अध्यक्ष ही दोन पदे बिनविरोध निवडून आली आहेत. यंदाच्या निवडणुकीत कालपर्यंत गोंधळाचे वातावरण असल्यामुळे एकही पॅनल अस्तित्वात नव्हता. मात्र काल अजिंक्य नाईक बिनविरोध निवडून आल्यानंतर शरद पवार आणि आशीष शेलार दोघांचेही पॅनल तयार झाले. मात्र आज या दोन्ही गटांनी एकत्र निवडणूक लढवत असल्याचे जाहीर केल्यामुळे समीकरणे बदलली आहेत.
पवार–शेलार पॅनलकडे सचिवपदाचा उमेदवारच नाही
शरद पवार आणि आशीष शेलार यांची वेगवेगळी पॅनल निवडणूक लढवत होती. मात्र आज दोघांमध्ये जागांचा समझोता झाला आणि दोन्ही पॅनलनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र सचिव पदासाठी कोणत्या उमेदवाराला संयुक्त पॅनलमधून संधी द्यावी याबाबत एकमत न झाल्यामुळे त्यांनी सर्वात महत्त्वाच्या सचिव पदासाठी एकाही उमेदवाराला आपला पाठिंबा दर्शविला नाही. पवार पॅनलमधून उन्मेष खानविलकर तर शेलार पॅनलमधून शाह आलम शेख यांनी सचिवपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.
गावसकर, तेंडुलकर, वेंगसरकरांसह 375 मतदार
मुंबई क्रिकेट संघटनेच्या प्रतिष्ठsच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी 30 उमेदवार 14 पदांसाठी उभे राहिलेत आणि त्यांच्यासाठी एमसीएचे 375 मतदार आपला हक्क बजावतील. या मतदारांमध्ये 210 मैदान क्लब, 77 ऑफिस क्लब, 36 शाळा आणि कॉलेज क्लब आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देशासाठी खेळलेले 52 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूही आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. यात सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, चंद्रकांत पंडित, समीर दिघे, वसीम जाफर, लालचंद राजपूतसारख्या कसोटीपटूंचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी नेहमीच 95 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होते. उद्याही मतदानाची टक्केवारी अशीच असेल.
नार्वेकर, आव्हाड रिंगणात
गत निवडणुकीत अॅपेक्स कौन्सिलमध्ये सर्वाधिक मते घेऊन विजयी ठरलेले शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर पुन्हा एकदा त्याच जागेसाठी उभे राहिले आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क पाहता ते यंदाही सर्वाधिक मते मिळवून विजयी ठरतील, असा अंदाज आहे. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड उपाध्यक्ष पदासाठी नवीन शेट्टींशी भिडणार आहेत. ही लढत रंगतदार होईल, असे चित्र आहे. तसेच संयुक्त सचिव पदासाठी संयुक्त पॅनलमधून गौरव पय्याडेंचे नाव समोर आले असले तरी नीलेश भोसले यांचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.




























































