पाणी जपून वापरा… शुक्रवार, शनिवारी घाटकोपर, कुर्ला, चेंबूर, माटुंगामध्ये पाणी बंद

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या काही जुन्या जलवाहिन्या बदलणे, दुरुस्ती करण्याची कामे हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवार 14 नोव्हेंबरपासून घाटकोपर, कुर्ला, चेंबूर आणि माटुंग्यामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून शनिवार 15 नोव्हेंबर सकाळी 8 वाजेपर्यंत घाटकोपर, कुर्ला, चेंबूर आणि माटुंग्यामध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या काळात रहिवाशांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. पालिकेने हाती घेतलेल्या कामांमध्ये 1200 मिलिमीटर व्यासाची जुनी तानसा जलवाहिनी, 1200 मिलिमीटर व्यासाची नवीन तानसा जलवाहिनी आणि 800 मिलिमीटर व्यासाच्या विहार ट्रंक मुख्य जलवाहिनीवरील 300 मिलिमीटर, 600 मिलिमीटर व 900 मिलिमीटर व्यासाच्या एकूण पाच झडपा बदण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे या 22 तासांच्या कालावधीत महानगरपालिकेच्या एन, एल, एम पश्चिम आणि एफ उत्तर विभागातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.