सरकारी कार्यालयांनी थकवला 1800 कोटींचा मालमत्ता कर, पालिकेचा लाखोंचा महसूल बुडतोय

मुंबई महानगर पालिका सध्या राज्य सरकारच्या अखत्यारीत असली तरी मुंबईतील विविध सरकारी कार्यालयांनी महापालिकेलाच गंडा घातला आहे. मुंबई महापालिकेचा तब्बल 1800 कोटी 33 लाख रुपयांचा मालमत्ता कर सरकारी कार्यालयांनी थकवला असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली आहे.

जकात बंद झाल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य आधार मालमत्ता कर राहिला आहे. मात्र अनेक सरकारी संस्था हा कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. शासकीय कार्यालयांनी मालमत्ता कर थकविल्यामुळे महापालिकेला हजारो कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे. कर भरण्याकडे सरकारी यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

थकबाकीची आकडेवारी

एमएमआरडीए : 929 कोटी 79 लाख 76 हजार 852 रुपये

म्हाडा प्रशासन : 368 कोटी 55 लाख 89 हजार 967 रुपये

मुंबई पोलीस : 71 कोटी 43 लाख 42 हजार 662 रुपये

राज्य सरकारी कार्यालये : 221 कोटी 85 लाख 78 हजार 17 रुपये

केंद्र सरकारी कार्यालये : 208 कोटी 68 लाख 76 हजार 602 रुपये