गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या कामाची शिवसेनेकडून पाहणी, हबाळे आदिवासी पाडय़ातील नागरिकांना सुविधा देण्याच्या सूचना

शिवसेनेच्या वतीने गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या कामाची पालिकेच्या अधिकाऱयांसोबत पाहणी करण्यात आली. या वेळी स्थानिक नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्याच्या सूचना पालिकेच्या अधिकाऱयांना देण्यात आल्या. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या प्रवेशद्वाराजवळ उड्डाणपूल उतरणार असून येथे वाहनांची कोंडी होण्याची शक्यता आहे. भविष्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत नियोजन बैठक आयोजित करण्याच्या महापालिका परिरक्षण विभाग, पूल विभाग व रस्ते विभागालादेखील सूचना देण्यात आल्या.

शिवसेना नेते, विभागप्रमुख – आमदार सुनील प्रभू यांनी पालिकेच्या रस्ते, पूल आणि परिक्षण विभागाच्या अधिकाऱयांसमवेत गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग येथील रत्नागिरी हॉटेल ते फिल्मसिटी गेटपर्यंत जाणाऱया उड्डाणपुलाची पाहणी करत स्थानिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या नागरी निवारा, दिंडोशी महानगरपालिका वसाहत, जयभीम नगर, श्रीकृष्ण नगर या वसाहतीतील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या. श्रमसाफल्य सोसायटीजवळ श्रीकृष्ण नगरमधील नागरिकांना संतोष नगर बस स्टॉपवर जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात यावा, रस्त्याच्या मध्यभागी असलेली पर्जन्य जलवाहिनी एका बाजूला घेऊन ती नव्याने तयार करण्यात यावी, गणेश मंदिर, इंदिरा विकास पेंद्र येथे श्रीकृष्ण नगर येथून येणाऱया नागरिकांना व गाडय़ांना गोरेगावकडे जाण्यासाठी त्रास होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी तसेच बेस्ट बस फिरण्यासाठी टर्मिनल तयार करण्यात यावे, अशा सूचना आमदार सुनील प्रभू यांनी केल्या. या वेळी माजी उपमहापौर सुहास वाडकर, माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, शाखाप्रमुख संपत मोरे व सर्व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या बोगद्याच्या कामामुळे दादासाहेब फाळके चित्रनगरीतील हबाले आदिवासी पाडय़ातील रस्ता पाडय़ातील आदिवासी बाधवांना ये-जा करण्यासाठी बंद झाला होता. यामुळे नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत होती. या मिसिंग लिंक रस्त्याचे काम आता मुंबई महानगर पालिकेकडून सुरू करण्यात आले असून याचा शुभारंभ आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते झाला.