
उपनगरी रेल्वे मार्गावर व्यापक स्वच्छता मोहीम राबवल्यानंतर पश्चिम रेल्वे प्रशासन आता 15 स्थानकांच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेणार आहे. स्थानक परिसरात थुंकण्याचे प्रकार सुरूच असतात. त्यांना अनोख्या पद्धतीने चाप लावण्यासाठी स्थानकांच्या आवारातील भिंतींवर त्या-त्या भागातील वैशिष्टय़ांना अनुसरून सुंदर चित्रे रेखाटली जाणार आहेत.
2016 मध्ये पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने देशात सर्वप्रथम रेल्वे स्थानकांच्या सौंदर्यीकरणाची संकल्पना राबवली. त्यावेळी ‘हमारा स्टेशन, हमारी शान’ उपक्रमांतर्गत रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण केले होते. मुंबईत तो उपक्रम यशस्वी झाल्यानंतर देशभरातील इतर रेल्वे स्थानकांच्या सौंदर्यीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. त्या उपक्रमाचा दुसरा टप्पा पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील 15 स्थानकांवर राबवण्यात येणार आहे. चर्चगेटसह विविध स्थानकांवर त्या-त्या भागाची ओळख असलेली चित्रे रेखाटण्यात येणार आहेत. स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी होऊन रेल्वे स्थानकांच्या भिंतींवर आकर्षक डिझाईन काढणार आहेत.
मुंबईची चाळ संस्कृती, डबेवालेही झळकणार
रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण करताना त्या-त्या भागाचे महत्त्व चित्रांतून सादर केले जाणार आहे. त्यात शहरातील विविध ऐतिहासिक वास्तू, मुंबईची चाळ संस्कृती, मुंबईचे डबेवाले यांचीही चित्रे झळकणार आहेत. नजीकच्या भविष्यात त्या चित्रांची काळजी घेतली जाईल. त्यांचे आवश्यकतेनुसार पुन्हा रंगकाम केले जाईल, असेही पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.




























































