40 वर्षीय व्यक्तीकडून लोकलमध्ये वकिल महिलेचा विनयभंग, पोलिसांत गुन्हा दाखल

चर्चगेट रेल्वे पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध लोकलमध्ये महिलेचा विनयभंग केल्याचा आणि तिचा व्हिडिओ परवानगीशिवाय चित्रीत केल्याचा आरोप असल्याने गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीची ओळख हेमांशू गांधी (40) अशी झाली असून तो मालाड (पूर्व) येथील रहिवासी असून तो एका खासगी कंपनीत कर्मचारी आहे. पीडित महिला 30 वर्षांची वकिल असून ती मुंबई हायकोर्टात वकिली करते. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना 9 नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास चर्चगेट बोरीवली फास्ट लोकलच्या जनरल डब्यात घडली.

पीडित महिला बांद्रा (पश्चिम) येथे राहते आणि ती कामावरून घरी परतत असताना आरोपीने तिचा व्हिडिओ तिच्या परवानगीशिवाय चित्रीत केला. महिलेनं या कृतीचा विरोध केला आणि गाडीतून उतरल्यानंतर बोरीवली रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

बोरीवली पोलिसांनी झिरो FIR दाखल करून प्रकरण चर्चगेट रेल्वे पोलिसांकडे वर्ग केले. हे प्रकरण 10 नोव्हेंबर रोजी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 77 (गुप्त चित्रीकरण/व्हॉयरिझम), 78 (पाठलाग करणे/स्टॉकिंग) आणि 79 (महिलेला अपमानित करण्याच्या हेतूने केलेली कृती, शब्द किंवा हावभाव) अंतर्गत नोंदवले गेले आहे. जीआरपीने (Government Railway Police) आरोपीला नोटीस बजावली आहे.