
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या कोरेगाव पार्क-मुंढवा येथील जमीन घोटाळ्याचा व्यवहार चांगलेच अडचणीत आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहेत. हे प्रकरण रद्द केले असे म्हटले जात असले तरी मुलाचा प्रताप समोर आल्यानंतर अजित पवार यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी होत असतानाच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपकडून पार्थ पवारला वाचवले जात आहे. याच संदर्भात वर्षावर झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती, असा दावा दानवे यांनी केला.
फडणवीसांनाच विचारा, पार्थला कसे वाचवले, ही पार्थ पवार प्रकरणावर परवा शरद पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पार्थला वाचवूच शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी थेट भूमिका घेतल्याशिवाय पार्थ पवार वाचू शकत नाही. वर्षावर ज्या बैठका झाल्या त्यात अजित पवार यांनी संतापाने सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देतो इथपर्यंत भूमिका घेतल्याचे कानावर आले आहे. खरे खोटे बाहेर येईल, पण अजित पवारांच्या या भूमिकेमुळेच त्यांना आणि पार्थ पवार यांना वाचवले जात असल्याचे वाटते, असे अंबादास दानवे म्हणाले.
मुंढवा प्रकरण उघड झाल्यावर अजित पवार अडचणीत येतील हे भाजपला माहिती होते आणि त्यांना अडचणीत आणणे हेच उद्दिष्ट होते. ही मोडस ऑपरेंडी असून आता अजित दादांची फाईल तयार झाली आहे. उद्या जर अजित पवारांनी काही केले तर एका मिनिटात पार्थ पवारांना अटक होऊ शकते. हे भाजपचे षडयंत्र असून त्यातूनच पार्थ पवार प्रकरण समोर आल्याचा दावाही दानवे यांनी केला.
फडणवीस आधी चक्की पिसिंग… चक्की पिसिंग म्हणत होते आणि नंतर किसिंग सुरू झाले. हे म्हणजे भाजच प्रकरणं बाहेर काढायची, भाजपनेच अडचणीत आणायचे… भाजपची ही मोडस ऑपरेंडी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. एकीकडे महार वतनाची जमीन विकली जाते, पण कंपनीचा संचालक असतानाही पार्थ पवारवर गुन्हा दाखल होत नाही? मुद्रांक शुल्क माफ केले जाते. दुसरीकडे व्यवहार रद्द झाला म्हणायचा. पण व्यवहार रद्द झाला तरी मुद्रांक शुल्क भरावे लागेल असे अधिकारी सांगतात. उद्या इतर लोकही असेच करतील. त्यामुळे बावनकुळे यांनी घेतलेली भूमिका चूक आहे. यात भाजप पार्थ पवारांना वाचवत असल्याचे दिसते. पार्थ पवार लहान बाळ नसून त्यांनी लोकसभा निवडणूक लढलेली आहे. त्यामुळे त्यांना कुणाचा मुलगा म्हणून नाही तर भारतीय नागरीक आणि गुन्हेगार म्हणून वागवा. परंतु भ्रष्टाचाराने बरबटलेली भाजप त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही दानवे यांनी केला.
या प्रकरणात तहसीलदारांचा बळी दिला जात आहे. पण तहसीलदारांमध्ये हा व्यवहार करण्याची क्षमता नाही. तो एक प्यादा असून जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनाही यात घेतले पाहिजे. तहसीलदाराचा बळी देऊन पार्थ पवार किंवा बड्या अधिकाऱ्याला वाचवणे चूक आहे. चौकशी समितीमधील अधिकारीही संशयास्पद आहे. ज्यांच्या अखत्यारित्यात हे प्रकरण झाले ते चौकशी करत आहेत. चोरी करणाऱ्याच्या हातात तपास सोपवण्याचा हा प्रकार आहे, असा आरोपही त्यांनी केला.





























































