
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोट प्रकरणात आता नवीन माहिती समोर येत आहे. स्फोटाच्या आदल्या दिवशी हरयाणातील फरीदाबादमधून अटक करण्यात आलेल्या संशयित डॉक्टर मुजम्मिलच्या वस्तूंमधून नवी माहिती समोर आली आहे. मुजम्मिलच्या खोलीतून सापडलेल्या डायरी आणि नोटबुकमधून उघड झाले आहे की हा दहशतवादी गट बराच काळापासून देशात दहशतीची योजना आखत होता.
इतकं नव्हे तर एका ठरवून आखलेल्या कटांतर्गत हिंदुस्थानात दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचा कट आखण्यात आला होता. सुरक्षा यंत्रणांच्या हाती आलेल्या डॉ. मुजम्मिल यांच्या डायरीमुळे आता दिल्ली स्फोटाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.
तपास यंत्रणेला डॉक्टर उमरच्या रूम नंबर-4 आणि डॉ. मुजम्मिलच्या रूम नंबर-13 या दोन्ही ठिकाणांहून डायरी सापडली आहे. त्याशिवाय, पोलिसांना मुजम्मिलच्या त्या खोलीतूनही एक डायरी मिळाली आहे, जिथून धौज भागात 360 किलो स्फोटके जप्त करण्यात आली होती. हे ठिकाण अलफलाह विद्यापीठापासून केवळ 300 मीटर अंतरावर आहे.
सापडलेल्या डायरी आणि नोटबुकमध्ये कोड वर्ड्सचा वापर करण्यात आला आहे. डायरीत 8 ते 12 नोव्हेंबर या तारखांचा उल्लेख आहे, ज्यावरून त्या कालावधीत काहीतरी मोठी योजना आखण्यात आली होती, असा संशय आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, डायरीत सुमारे 25 लोकांची नावेही सापडली आहेत, ज्यातील बहुतांशजण जम्मू-कश्मीर आणि फरीदाबाद येथील आहेत. आता हे सर्वजण पोलिसांच्या तपासाच्या कक्षेत आले आहेत.




























































