पत्नीने भटके कुत्रे घरात आणल्याने लैंगिक समस्या निर्माण झाल्या, पतीची घटस्फोटासाठी कोर्टात धाव

पत्नी भटक्या कुत्र्यांना घरात आणून त्यांचा सांभाळ करते म्हणून वैतागलेल्या एका पतीने न्यायालयात धाव घेत घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. पत्नीच्या या प्राणी प्रेमामुळे मला खूप तणाव आला व त्यामुळे माझे लैंगिक स्वास्थ बिघडले. माझ्या लैंगिक शक्ती कमी झाल्या असा आरोप पतीने केला आहे. याप्रकरणी न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे.

गुजरातमधील या जोडप्याचे 2006 मध्ये लग्न झाले होते. ते ज्या सोसायटीत राहत होते. तिथे भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यास व पाळीव प्राण्यांना फिरवण्यास मनाई होती. तरिदेखील सदर व्यक्तीच्या पत्नीने भटक्या कुत्र्यांना त्यांच्या घरी आणले. त्यावरून सोसायटीमधली लोकं या दाम्पत्यावर चिडली होती. अनेकांसोबत त्यांचे वादही झाले. त्यानंतरही पत्नीने पतीचे काहीच ऐकले नाही. याउलट तिने पतीला कुत्र्यांना आंघोळ घालणे, त्यांना खाऊ घालायला लावले. यावरून अनेकदा त्यांचे वाद झाले.

2009 मध्ये ते राहत असलेल्या सोसायटीने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी पत्नीने प्राणी प्रेमी संघटनांच्या मदतीने सोसायटीविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल केल्या. त्यामुळे सोसायटी व या दाम्पत्यात वाद सुरू होते. त्यामुळे पतीच्या मानसिक स्वास्थावर परिणाम झाला. या सगळ्याला कंटाळून पती बंगळुरूला निघून गेला. मात्र तरिही पत्नीचा जाच सुरू होता.

या सगळ्याला कंटाळून पतीने 2017 मध्ये अहमदाबादच्या कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. तो पत्नीला 15 लाख पोटगी द्यायलाही तयार झाला. मात्र पत्नीने त्याच्याकडे 2 कोटीची पोटगी मागितली आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 1 डिसेंबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.