
पूर्व लडाखमध्ये चीनच्या सीमेजवळच्या न्योमा हवाई तळ पुन्हा सक्रिय करण्यात आला आहे. 1962 च्या हिंदुस्थान-चीन युद्धानंतर प्रथमच हा तळ सक्रिय झाला आहे. वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी स्वतः सी-130 जे सुपर हर्क्युलस या मालवाहू विमानाचे लँडिंग केले. चीनसोबत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा तळ सक्रिय होणे खूप महत्त्वाचे आहे.
2023 मध्ये या तळाच्या नव्याने उभारणीचे काम सुरू झाले होते. त्यासाठी 218 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. लडाखमध्ये वायुसेनेचा हा चौथा तळ आहे.
वेगाने वाहतूक करणे होणार शक्य
न्योमा तळ हा चीनच्या सीमेपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असून 2.7 किलोमीटर लांबीची धावपट्टी आहे. त्यावर अत्याधुनिक लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर तसेच मोठी मालवाहू विमाने उतरू शकतात. सैनिक तसेच शस्त्रास्त्रांची वाहतूक अतिशय वेगाने केली जाऊ शकते. त्यामुळे या तळाला फार महत्त्व आहे.


























































