‘मरे’च्या लोकलचा ‘लेटमार्क’ संपणार! कल्याण-कर्जतदरम्यान १० रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद होणार

>> अजय गायकवाड

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते कर्जतदरम्यान असलेली तब्बल १० रेल्वे फाटके कायमस्वरूपी बंद करून त्यांच्या जागी उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. यामुळे ‘मरे’च्या लोकलचा लेटमार्क कायमचा संपणार आहे. या कामाला डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. यामुळे लोकल, मेल-एक्स्प्रेस वेळेवर धावतील. तसेच नागरिकांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार वांगणी स्थानकाजवळची ४, नेरळमधील १, भिवपुरीतील ३ आणि कर्जतजवळची २ अशी १० फाटके बंद केली जाणार आहेत. सर्व फाटके कायमस्वरूपी बंद केल्याने येथील रस्त्यावर गाड्यांना थांबावे लागणार नाही आणि प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. परिणामी लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावणार असून प्रवाशांच्या सुरक्षेसह वेळेची मोठी बचत होईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असून डिसेंबरपासून उड्डाणपुलांच्या बांधकामाला सुरुवात होईल. काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण-कर्जतदरम्यान लोकल प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी होणार आहे.

दिवसातून ४५ वेळा उघड-बंद

उपनगरीय मार्गावरील लेव्हल क्रॉसिंग दिवसातून तब्बल ४० ते ४५ वेळा उघड-बंद केली जातात. याचा थेट परिणाम लोकलच्या वक्तशीरपणावर होत होता. मध्य रेल्वेच्या एकूण ८९४ लोकलपैकी तब्बल ७० ते ७५ टक्के लोकल या फाटकांमुळे थांबतात किंवा मंदावतात. आता उड्डाणपूल तयार झाल्यानंतर या मार्गावरील प्रवाशांची लेटमार्कच्या समस्येतून सुटका होईल.

फाटक बंद केले की सात मिनिटे वाया

कल्याण ते कर्जत रेल्वे मार्गावरील क्रॉसिंग वारंवार उघड-बंद होत असल्याने लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांचा वेग मंदावतो. एक फाटक उघडून पुन्हा बंद होण्यासाठी साधारण ३ ते ७ मिनिटांचा वेळ लागतो. काही वेळा वाहनांची गेटला धडक बसल्याने लोकल सेवेवर परिणाम होऊन वेळापत्रक कोलमडते. मात्र आता फाटक बंद करून उड्डाणपूल बांधण्याच्या निर्णयामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे.