
राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावरील प्राथमिक फेरीतील खल्वायन रत्नागिरी या नाट्यसंस्थेने सादर केलेला प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ झाला. रसिक प्रेक्षकांनी बसायला खुर्ची नसल्यामुळे उभं राहून अडीच तास या नाट्यप्रयोगाचा अनुभव घेतला. राज्य नाट्य स्पर्धेतील नाट्यप्रयोग पहायला प्रेक्षक येत नाहीत. अनेकवेळा दहा-पंधरा प्रेक्षक आणि परीक्षक यांच्या समोर नाटक सादर करावं लागतं हा आरोप रत्नागिरीच्या नाट्यप्रेमींनी पुसून टाकताना राज्य नाट्य स्पर्धेत उपस्थितीचा नवा विक्रम नोंदवला आहे.
दि.१० नोव्हेंबर पासून 64 व्या राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहात सुरू झाली. पहिल्या दोन नाट्यप्रयोगांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. तिसरा प्रयोग कास गुरूवारी रात्री सादर झाला. खल्वायन रत्नागिरी या संस्थेने ‘मंगलाष्टक’ हे नाटक सादर केले. स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहात तब्बल १ हजार ०९ प्रेक्षक उपस्थित होते. अनेक प्रेक्षकांनी हे नाटक उभं राहून पाहिले.
चौदा हजाराचा गल्ला
राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या तिकीटाचे दर माफक असतात. पुढील रांगा १५ रूपये आणि मागील रांगेतील तिकीट १० रुपये असते. गुरूवारी रात्री सादर झालेल्या मंगलाष्टक या नाटकाने १३ हजार ९८० रूपयांचा गल्ला गोळा केला. तिकीट विक्रीतून येणाऱ्या रक्कमेचा ५० टक्के हिस्सा सादरीकरण करणाऱ्या नाट्यसंस्थेला देण्यात येतो.


























































