छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात बेवारस लाल बॅगमुळे घबराट, पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाची धावाधाव

दिल्लीतील दहशतवादी आत्मघातकी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला असताना आज मुंबईत एक घबराट उडविणारी घटना घडली. सदैव गजबजलेल्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेरील बस डेपोत एक लाल रंगाची बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासाअंती त्या बॅगेत कपडे व कागदपत्रे मिळून आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दिल्लीतील भीषण बॉम्बस्पह्टानंतर मुंबईत हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे. असे असताना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बस डेपोतील एका स्टॉपवर बेवारस लाल बॅग आढळून आली. बराच वेळ त्या बॅगेवर कोणी दावा करीत नसल्याने सतर्क नागरिकांकडून तत्काळ पोलिसांना कळविण्यात आले. याची तत्काळ दखल घेत आझाद मैदान पोलिसांचे पथक तेथे दाखल झाले. मग बॉम्बशोधक व नाशक पथकाने तेथे जाऊन बॅगेची तपासणी केली. तेव्हा त्या बॅगेत कपडे व कागदपत्रे मिळून आली. त्या कागदपत्रांवरून ती बॅग आसाममधील नागरिकाची असल्याचे समजते. कागदपत्रे कुठल्या तरी कंपनीशी संबंधित आहेत. त्यावरून एखाद्या मजुराची ती बॅग असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पोलीस त्या बॅगमालकाचा शोध घेत आहेत.