मुद्रा – विक्षिप्तपणाने झाकोळलेली विद्वत्ता!

>> राहुल गोखले

अनुवांशिकतेच्या क्षेत्रातील आधुनिक संशोधनाला दिशा व वेग देणारे क्रांतिकारक संशोधन करणाऱया त्रयींपैकी शेवटचा शिलेदार जेम्स वॉटसन यांचे नुकतेच निधन झाले. रोझालिंड फ्रँकलिन, वॉटसन व ािढक यांच्या डीएनए संरचनेच्या शोधाला 1962 मध्ये वैद्यकीय शाखेसाठीचे नोबेल पारितोषिक मिळालेच, पण जनुकीय संशोधनाला या शोधामुळे नवीन दिशा मिळाली.  

मेरिकेतील शिकागो येथे 6 एप्रिल 1928 रोजी जन्मलेल्या जेम्स वॉटसनला वयाच्या पंधराव्या वर्षी शिकागो विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली होती आणि तो जीवशास्त्राचा अभ्यास करीत होता. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी तो पदवीधर झाला. त्याच्या वाचनात एर्विन श्रोडिंजर यांनी लिहिलेले ‘व्हॉट इज लाईफ?’ हे पुस्तक आले आणि जनुकांच्या अभ्यासाची त्याला ओढ निर्माण झाली.

नुकतेच निवर्तलेले जेम्स वॉटसन लुरिया यांच्या शिफारशीवरून ब्रिटनमधील कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत संशोधन करण्यासाठी दाखल झाला. तेथेच दुसऱया प्रयोगशाळेत ािढक संशोधन करीत होता. या दोघांच्या स्वभावात मोठी तफावत होती, पण डीएनएच्या संरचनेच्या शोधाच्या उर्मीने त्या दोघांना एकत्र आणले. विल्किन्स आणि मुख्य म्हणजे त्यांची सहकारी रोझालिंड फ्रँकलिन यांनी डीएनएच्या क्ष-किरण विवर्तनाने मिळविलेल्या प्रतिमांचा अभ्यास करून वॉटसन यांनी डीएनए संरचनेचा शोध लावला. 1962 मध्ये या तिघांना वैद्यकीय शाखेसाठीचे नोबेल पारितोषिक मिळालेच, पण जनुकीय संशोधनाला या शोधामुळे नवीन दिशा मिळाली. या तिघांची भेट झाली नसती तरी कदाचित डीएनएच्या संरचनेचा शोध कालांतराने लागलाच असता, पण त्याला विलंब झाला असता.

वॉटसन हा महान संशोधक होता, पण त्याबरोबरच तो स्पष्टवक्ता होता. तो स्पष्टवत्तेपणा अनेकदा फटकळ वाटत असे व त्यामुळे वॉटसन वादग्रस्तदेखील ठरत असे. शाळेत वॉटसन हा काही हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात नसे. किंबहुना परीक्षेत आलेल्या अपयशामुळे त्याला शाळेतून काढून टाकलेले होते. तरीही वयाच्या पंधराव्या वर्षी त्याला शिकागो विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळाली. आपल्या आईचा तेथील अधिष्ठात्याशी परिचय होता असे सांगून वॉटसने ती शिष्यवृत्ती कशी मिळाली याची प्रांजळ कबुली दिली, पण आपल्या स्पष्टवत्तेपणाचा परिचयही घडविला.  ‘नेचर’ या प्रख्यात शोध नियतकालिकात वॉटसन यांचा शोधनिबंध 1953 मध्ये प्रकाशित झाला. डीएनएची संरचना द्विसर्पिलाकार आहे, चार प्रकारच्या क्षारकीय संयुगांपासून ते बनलेले आहे, एकमेकांभोवती सर्पिल पद्धतीने गुंतलेल्या दोन साखळ्यांच्या रूपात डीएनए असते हा शोध त्यातून जगासमोर आला. हा क्रांतिकारक शोध होता. या दोघांसह विल्किन्सला 1962 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. रोझालिंड फ्रँकलिनने संशोधन करून मिळवलेला एक पुरावा आपण तिच्या अनुमतीशिवाय वापरला होता असे कालांतराने सांगून वॉटसन याने खळबळ माजवून दिली. तिचा मृत्यू कर्करोगाने 1958 मध्ये झाला आणि मरणोत्तर नोबेल पारितोषिक देण्याचा प्रघात नसल्याने फ्रँकलिन उपेक्षित राहिली.

पुढे वॉटसन व ािढक यांचे मार्ग वेगवेगळे झाले. वॉटसन काही काळ कॅलिफोर्निया इस्न्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत होता, तर नंतर हार्वर्ड विद्यापीठात त्याने प्रथिननिर्मितीत आरएनएची भूमिका या विषयावर संशोधन केले. अर्थात त्यापैकी कोणत्याच संशोधनाला डीएनएच्या संरचनेच्या शोधाची उंची आली नाही यावरूनच डीएनएसंबंधी शोध केवढा क्रांतिकारक होता याची कल्पना येऊ शकेल. वॉटसनला दोन मुले. पैकी रुफुस या मुलाला सिझोफ्रेनिया व्याधी जडली. त्या दुःखातदेखील प्रेरित होऊन वॉटसन ‘जिनोम प्रोजेक्ट’कडे वळला. मानवी जिनोमचा नकाशा करण्याचा हा प्रकल्प होता. वॉटसनच्या नेतृत्वात शेकडो संशोधकांनी तो प्रकल्प यशस्वी करून दाखविला.

वॉटसन एकीकडे अतिशय गुणवान असला तरी आपल्या टोकाच्या मतांमुळे तो वादग्रस्त ठरत असे. अनेकदा त्याच्या प्रतिपादनाला अहंकाराचा दर्प येई. त्याने लिहिलेल्या ‘दी डबल हेलिक्स’ या आत्मकथनपर पुस्तकाच्या लक्षावधी प्रती खपल्या. त्याचे भाषांतर वीस भाषांत झाले. मात्र त्या पुस्तकातील प्रतिपादनाविषयी ािढक व विल्किन्स या दोघांनी नापसंती व्यक्त केली होती. 2007 मध्ये वॉटसनने ‘आफ्रिकी वंशाच्या लोकांमध्ये पाश्चात्य लोकांच्या तुलनेत बुद्धी कमी असते’ असे वर्णविद्वेषी विधान बिनदिक्कतपणे केले. त्यावरून काहूर उठले. परिणामत लंडनस्थित विज्ञान वस्तुसंग्रहालयाने वॉटसनचे व्याख्यान रद्द केले. त्याची परिणती त्याने ज्या कोल्ड स्प्रिंग प्रयोगशाळेचा कायापालट केला, त्या प्रयोगशाळेच्या सर्व पदांवरून त्याची उचलबांगडी होण्यात झाली. महिला या दुय्यम दर्जाच्या संशोधक असतात असे सूचक स्त्रीद्वेष्टे विधान त्याने केले होते. आपले होणारे बाळ समलैंगिक होणार असल्याचे चाचण्यांमधून समजले तर स्त्रियांनी आपला गर्भपात करून घ्यावा असे विधान 1994 मध्ये करून त्याने खळबळ माजवून दिली होती. आपल्याच क्षेत्रातील अन्य संशोधकांची संभावना तो अत्यंत असभ्य शब्दांत करीत असे. बरेच शास्त्रज्ञ हे केवळ संकुचित वृत्तीचे व बुद्धीने मंद नसून मूर्ख आहेत असे विधान करणाऱया वॉटसनला विज्ञान जगत कशी क्षमा करणार होते? त्याच्या एका पुस्तकाचे शीर्षकच मुळी ‘अव्हॉइड बोरिंग पीपल’ असे होते. साऱया विज्ञान जगताने आपल्याला वाऱयावर सोडले आहे असा कावा करीत त्याने चरितार्थासाठी आपले नोबेल पदक लिलावात काढले. रशियाचा उद्योगपती अलिशर ऊसमानोव्हने चाळीस लाख डॉलरला ते विकत घेतले आणि मग पुन्हा वॉटसनला सुपूर्द केले.

अनुवांशिकतेच्या क्षेत्रातील आधुनिक संशोधनाला दिशा व वेग देणारे क्रांतिकारक संशोधन करणाऱया त्रयींपैकी ािढक व विल्किन्स या दोघांचा मृत्यू 2004 मध्ये झाला. आता त्यातील शेवटचा शिलेदारही निवर्तला. वॉटसनच्या विद्वत्तेबद्दल कोणालाही शंका नव्हती व जगाने त्याचा त्यासाठी गौरवही केला. तथापि त्या विद्वत्तेस आपण सोडून सर्व जग मूर्ख असा अहंकाराचा व टोकाच्या, पण बिनबुडाच्या मतांचा दर्प आला नसता तर वॉटसनचे विशेषत विज्ञान जगताने आणखी कौतुक केले असते आणि एक महान पण विक्षिप्त, अहंकारी व वादग्रस्त शास्त्रज्ञ अशा प्रतिमेचे धनी होण्याची वेळ जेम्स वॉटसनवर आली नसती.

(लेखक आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत.)

[email protected]