
दोन टप्प्यात झालेल्या बिहार निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने बिहार विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत मिळवत सत्ता काबीज केली. मात्र राजदला फक्त 25 जागांवर समाधान मानावे लागले. विधानसभा निवडणुकीत महाआघाडीच्या दारुण पराभवानंतर, राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अशातच लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी शनिवारी मोठी राजकीय उलथापालथ केली. तिने सोशल मीडिया पोस्टमध्ये राजकारणातून निवृत्ती घेत कुटुंबाशी असलेले संबंध तोडण्याची घोषणा केली.
रोहिणी आचार्य यांनी इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये ही घोषणा केली. त्यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे बिहारमध्ये राजकीय तणाव निर्माण झाला आहे. कुटुंबातील या अंतर्गत गोंधळामुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. रोहिणीने तिच्या निवेदनात एक धक्कादायक दावा केला आहे, ज्यामध्ये तिने म्हटले आहे की संजय यादव आणि रमीज यांनी तिला हे करण्यास सांगितले होते. रोहिणीने ट्विटरवर लिहिले आहे की, “मी राजकारण सोडत आहे आणि माझ्या कुटुंबाशी संबंध तोडत आहे.
I’m quitting politics and I’m disowning my family …
This is what Sanjay Yadav and Rameez had asked me to do …nd I’m taking all the blame’s— Rohini Acharya (@RohiniAcharya2) November 15, 2025
पक्षाकडून किंवा कुटुंबाकडून अद्याप कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र राजद गटात या पदाबद्दल बरीच चर्चा सुरू आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाने मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांच्यासोबतचे संबंध तोडले होते. तेज प्रताप यादव यांनी स्वतंत्र पक्ष काढून बिहार विधानसभा निवडणूक लढवली. तर बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर असाच एक धक्का लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबाला बसला आहे.



























































