
अमेरिका गाझा पट्टीचे दोन भागात विभाजन करण्याची तयारी करत आहे. यासाठी दीर्घकालीन योजना तयार करण्यात आली आहे. एका भागावर आंतरराष्ट्रीय सुरक्षा दल (ISF) आणि इस्रायली सैन्याचे नियंत्रण असेल. याला ग्रीन झोन म्हटले जाईल. पॅलेस्टिनी लोकांची वस्ती असलेला दुसरा भाग सध्यातरी उध्वस्तच राहील. याला रेड झोन असे नाव देण्यात आले आहे. रेड झोनमध्ये जवळजवळ सर्व पॅलेस्टिनी विस्थापित झाले आहेत.
अमेरिकन लष्करी गुप्तचर कागदपत्रे आणि अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक विधानांवर आधारित द गार्डियनच्या एका वृत्तात हा दावा करण्यात आला आहे. या वृत्तानुसार, या योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे.
गाझाच्या पूर्व भागात एक ग्रीन झोन स्थापन केला जाईल. इस्रायली सैन्यासोबत परदेशी सैन्य येथे तैनात केले जाईल. तेथे पुनर्विकासाचे काम केले जाईल. अमेरिका तेथे आंतरराष्ट्रीय सुरक्षा दलांच्या तैनातीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून औपचारिक मान्यता मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. योजनेनुसार, सुरुवातीला येथे काहीशे सैन्य तैनात केले जाईल. ही संख्या नंतर २०,००० पर्यंत वाढवता येईल. कोणत्याही परदेशी सैन्याला ग्रीन झोन सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.
तसेच इस्रायलच्या नियंत्रणाखालील यलो लाईनच्या पश्चिमेकडील भागाला रेड झोन म्हटले जाईल. येथे पुनर्विकासाला परवानगी दिली जाणार नाही. दोन वर्षांच्या युद्धात या भागाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. येथे सुमारे २० लाख लोक अडकली आहे. ही संपूर्ण योजना अलिकडच्या युद्धबंदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. ट्रम्प प्रशासनाने म्हटले होते की, गाझा एकसंध होईल आणि पॅलेस्टिनी राजवट पुनर्संचयित केली जाईल.





























































