पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण -अजितदादा शहा-शरणी

पुत्र पार्थ पवार याच्या अमेडिया कंपनीच्या जमीन घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच राजकीय कोंडीत सापडले आहेत. या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. जमीन घोटाळय़ाच्या या प्रकरणातून वाचण्यासाठी अजितदादा यांनी शुक्रवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पुण्यातील भूखंड घोटाळय़ात नियमानुसार कारवाई केली जाईल. या गुह्याचा तपास सुरू असताना भविष्यात त्यात कुणाचा सहभाग आढळला तर त्याच्यावर कारवाई होईल. कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. हे लक्षात घेता अजितदादा यांनी अमित शहा यांची भेट घेऊन पुण्यातील मुंढवा आणि बोपोडी जमीन खरेदी घोटाळय़ाची वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली. जमीन खरेदीचे हे दोन्ही व्यवहार रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणातून पार्थला वाचवा, असे साकडे त्यांनी शहा यांना घातल्याचे बोलले जात आहे.

अमेडिया कंपनी प्रकरणाचा अहवाल सोमवारी सादर होणार

अमेडिया कंपनीने खरेदी केलेल्या जमीन खरेदीची निबंधक कार्यालात दस्त नोंदणी करण्यात आली. दस्त नोंदणी करताना झालेली अनियमितता तपासण्यासाठी प्रभारी नोंदणी महानिरीक्षकांनी नेमलेल्या समितीचा अहवाल सोमवारी सादर होणार आहे.

दोघांमध्ये जवळपास अर्धा तास खलबते

अजित पवार यांच्या अमित शहांच्या भेटीमुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास खलबते झाली. यामध्ये पार्थ याच्या जमीन घोटाळय़ाव्यतिरिक्त राज्यातील अन्य काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.