
अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनीही कायमच शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे. आता शिवशक्तीबरोबर भीमशक्ती एकत्र आल्यामुळे ताकद आणखी वाढली असून, मनपा निवडणूक शतप्रतिशत जिंकू, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, शिवसेनेसोबत आंबेडकरी समाज, भीमसैनिक खंबीरपणे उभा राहणार आहे. समाजाला शिवसेनाच न्याय देऊ शकते. हा विश्वास आहे म्हणूनच आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे, असे रिपाइंचे (गवई गट) शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी सांगितले.
निवडणुकीसाठी शिवसैनिक, भीमसैनिकांनी कंबर कसून कामाला लागावे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार आणि आपले शहर विकासाचे व्हिजन लोकांपर्यंत पोहोचवा. प्रत्येक भाग पिंजून काढा, घराघरांत पोहोचा, असे आवाहन किरण काळे यांनी केले.
जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग केला होता. आता तो अहिल्यानगर शहरातही झाला आहे. दक्षिण लोकसभा मतदारसंघातील अहिल्यानगर शहरासह सर्व तालुक्यांतील इच्छुकांची चाचपणी करण्यासाठी लवकरच बैठक होणार आहे, असे जिल्हाप्रमुख दळवी यांनी सांगितले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, कामगार सेनेचे विलास उबाळे, अनिस चुडीवाला, उपशहरप्रमुख सुनील भोसले, प्रतीक बारसे, उषा भगत, शैला लांडे, गणेश आपरे, शंकर आव्हाड, रिपाइं अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गुलामअली शेख, ओबीसी आघाडी शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष नईम शेख, वाहतूक आघाडी शहराध्यक्ष विल्सन रुकडीकर, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अजिम खान, स्वप्नील साठे, निजाम शेख, जमीर सय्यद, अरबाज शेख, आफताब बागवान, योहान चाबुकस्वार, हुसेन चौधरी, दानिश शेख, जमीर सय्यद, झाहिद अली सय्यद, मुस्तफा शेख, हुसेन चौधरी, राजेश बनसोडे, जय गजरमल, मंगेश तिजोरे, आकाश काळे, अभिजीत पंडित, स्वप्नील साठे, लकी वाघमारे, सोहेल शेख आदी उपस्थित होते.
आम्ही आघाडीत छोटा भाऊ — सुशांत मस्के
सुशांत मस्के म्हणाले, आता रिपाइं गवई गटाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाबरोबर आघाडी केली आहे. अन्य कुणाशी आघाडी करायची किंवा कसे, याचा निर्णय हा सर्वस्वी शिवसेनेने घ्यावा. आम्ही शिवसेनेचा छोटा भाऊ आहोत. आंबेडकरी समाजाला हातात हात घालून मोठा भाऊ या नात्याने शिवसेना पुढे घेऊन जात आहे. आम्हीदेखील खांद्याला खांदा लावून निवडणूक ताकतीने लढणार आहोत, असे त्यांनी सांगितले.



























































