
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. या लढतीवर हिंदुस्थानचे वर्चस्व दिसत असले तरी एक चिंतेची बातमी आहे. कर्णधार शुभमन गिल हा पहिल्या डावात 4 धावांवर खेळत असताना रिटायर्ड हर्ट झाला होता. मानदुखीमुळे त्याने मैदान सोडले होते. त्यानंतर तो मैदानात उतरला नाही. त्यामुळे हिंदुस्थानचा पहिला डाव 7 बाद 189 धावांवर आटोपला. आता दुसऱ्या डावातही गिलची मैदानावर उतरण्याची शक्यता कमी असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे वृत्त ‘आज तक‘ने दिले आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शुभमन गिल याला स्ट्रेचरवरून वुडलँड्स रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गिलवर योग्य उपचार व्हावे यासाठी रुग्णालय प्रशासनाने तातडीने पावले उचलत स्कॅन आणि एमआयआर चाचणी केली आहे. गिलला मान आणि त्याच्या आसपासच्या भागात वेदना होत असून सध्या त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात सुंदर आणि राहुलमध्ये अर्धशतकीय भागिदारी झाली. दोघेही मोठी धावसंख्या करतील असे वाटत असताच आधी सुंदर 29 आणि नंतर राहुल 39 धावांवर बाद झाला. सुंदर बाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिल मैदानात उतरला. चौकार ठोकत त्याने उत्तम सुरुवात केली. मात्र मानेमध्ये वेदना होऊ लागल्याने त्याने मैदान सोडले.

शुभमन गिल याने सुरुवातीचे दोन चेंडू सावधपणे खेळून काढले. मात्र तिसऱ्या चेंडूवर त्याने बॅकवर्ल्ड स्क्वेअर लेगवरून चौकार ठोकला. हा फटका मारल्यानंतर गिल वेदनेने कळवळला आणि त्याने स्वत:ची मान पकडली. हे पाहताच फिजिओंनीही मैदानात धाव घेतली. प्राथमिक उपचारानंतर गिल तूर्तास फलंदाजी करू शकणार नाही हे जाणवताच त्याला मैदानातून बाहेर नेण्यात आले. त्यानंतर तो पुन्हा फलंदाजीसाठी आणि नंतर क्षेत्ररक्षणासाठीही मैदानात उतरला नाही. त्याच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत याने संघाचे नेतृत्व केले.



























































