भाजपनं तिकीट नाकारल्यानं व्यथित झालेल्या RSS कार्यकर्त्यानं जीवन संपवलं, स्थानिक नेत्यांवर केलेले गंभीर आरोप

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने तिकीट नाकारल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याने टोकाचे पाऊल उचलले. आनंद. के. थंपी असे आरएसएस कार्यकर्त्याचे नाव असून शनिवारी सायंकाळी त्यांना राहत्या घराजवळील शेडमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. केरळच्या तिरुक्कन्नपुरम येथे ही घटना घडली आहे.

केरळमध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आनंद के. थंपी यांना तिरुकन्नपुरम येथून तिकीट हवे होते. मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारले. यामुळे व्यथित झालेल्या आनंद यांनी गळफास घेतला. तत्पूर्वी त्यांनी स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोपही केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मृत्युपूर्वी आनंद यांनी त्यांच्या मित्रांना व्हॉट्सअप संदेशही पाठवला होता. यात त्यांनी आरएसएस आणि भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. आनंद यांना निवडणुकीत उभे राहण्याची इच्छा होती आणि त्यांनी याबाबत नेत्यांना कळवलेही होते. मात्र स्थानिक त्यांनी वाळू तस्करी करणाऱ्या लोकांना तिकीट दिल्याचे म्हटले होते.

उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर त्यात नाव नसल्याने आनंद व्यथित झाले होते. त्यांनी सोशल मीडियावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची घोषणाही केली होती. मात्र या निर्णयानंतर आपले मित्र आपल्यापासून दूर गेल्याचेही त्यांनी म्हटले. यामुळे आपल्याला दु:ख झाल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच शनिवारी आत्महत्या करण्याचा इशाराही त्यांनी संदेशात दिला होता. हा संदेश पाहिल्यानंतर त्यांच्या मित्रांनी तातडीने त्यांच्या घरी धाव घेतली. तिथे त्यांना आनंद यांनी गळफास घेतल्याचे दिसले. मित्रांनी पोलिसांना माहिती देत आनंद यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र सायंकाळपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आनंद के. थंपी यांनी तिकीटासाठी कधीही संपर्क साधला नव्हता आणि त्यांच्याशी याबाबत चर्चा झाली नसल्याचे म्हटले. भाजप प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनीही याबाबत भाष्य केले आहे. याबाबत आपली जिल्हाध्यक्षांशी चर्चा झाली आहे. प्रभागातून मिळालेल्या शॉर्ट लिस्टमध्ये आनंद याचे नाव नव्हते. तरीही आम्ही चौकशी करू, असे त्यांनी म्हटले.