बिहारमध्ये राजकीय घडामोडी वाढल्या; लालूप्रसाद यांच्या कुटुंबातील वादाकडे सगळ्यांचे लक्ष

बिहारमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, या राजकारणात लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील वादही वाढत आहे. रोहिणी आचार्य यांनी राजकारण सोडत कुटुंबाशी नाते तोडल्यानंतर आता लालूप्रसाद यादव यांच्या रागिणी, चंदा आणि राजलक्ष्मी या मुलींनीही पाटणा येथील निवासस्थान सोडून दिल्ली गाठली आहे. रोहिणी यांनी तेजस्वी आणि त्यांच्या दोन जवळच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील अंतर्गत कलह वाढतच चालला आहे. रोहिणी आचार्य यांच्या वादग्रस्त विधानानंतर आणि घर सोडल्यानंतर, आणखी तीन बहिणी – रागिनी, चंदा आणि राजलक्ष्मी – देखील त्यांच्या मुलांसह पाटणा सोडून दिल्लीला गेल्या आहेत. यावरून असे दिसून येते की हा वाद आता केवळ राजकीय राहिला नाही तर या वादने कौटुंबिक पातळीवर गंभीर वळण घेतले आहे.

राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी अलीकडेच कुटुंबाशी संबंध तोडण्याचा आणि राजकारण सोडण्याचा निर्णय जाहीर केला. तिने आरोप केला की तिचा भाऊ तेजस्वी यादव आणि त्याचे दोन जवळचे सहकारी – संजय यादव आणि रमीझ – यांनी तिचा अपमान केला, अपशब्द वापरले आणि चप्पलने मारण्याचा प्रयत्नही केला. भावनिक पोस्टमध्ये रोहिणीने लिहिले की तिला तिच्या माहेरून तिला हूसकून लावण्यात आले आणि अनाथ करण्यात आले. आपला स्वाभिमान दुखावला गेला आणि सत्य बोलल्याबद्दल तिला शिक्षा झाली.

या घडामोडींसोबतच तेज प्रताप यादव यांचा नवीन पक्ष जनशक्ती जनता दलने (जेजेडी) एनडीए सरकारला नैतिक पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. लालू कुटुंबातील कन्या रोहिणी आचार्य यांना पक्षाचे राष्ट्रीय संरक्षक म्हणून नियुक्त करण्याचा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला. पक्षाचे प्रवक्ते प्रेम यादव यांनी सांगितले की, तेज प्रताप यादव लवकरच त्यांच्याशी या प्रस्तावावर चर्चा करतील.