
श्री नायकेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त कोल्हापूरच्या शाहूवाडीतील सोंडोलीत 17 नोव्हेंबर 2025 रोजी भव्य ‘रोज मर्क केसरी’ आणि ‘सोंडोली केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने पृथ्वीराज पाटील आणि हर्षवर्धन सदगीर हे महाराष्ट्र केसरी एकमेकांशी भेटणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्या कल्पक आणि भन्नाट कुस्तीच्या डावांनी प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करणारा ‘छोटा पॅकेज बडा धमाका’ असलेला नेपाळी कुस्तीपटू देवा थापा या स्पर्धेचे खास आकर्षण असेल. कुस्ती रसिकांसाठी हा एक अविस्मरणीय क्षण ठरणार असून दोन महाराष्ट्र केसरी पैलवानांमधील थरारक लढत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान हे स्पर्धेचे मुख्य आकर्षण असणार आहेत.
आपल्या आगळ्या आणि भन्नाट दंगलींमुळे कुस्ती प्रेमींसाठी अविस्मरणीय क्षण जिवंत करणाऱ्या या भव्य स्पर्धेचे आयोजन सरपंच, उपसरपंच, अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, नाईकबा यात्रा कमिटी (मुंबईकर) व ग्रामस्थ मंडळ, सोंडोली यांनी केले आहे. या दंगलीत दोन महाराष्ट्र केसरीमध्ये पहिल्या नंबरची कुस्ती – मुख्य कुस्ती खेळली जाणार आहे. पाटील आणि सदगीर यांच्यात होणाऱ्या या लढतीत विजेत्याला ‘रोज मर्क केसरी’ आणि रोज मर्क लिमिटेडतर्फे मानाची चांदीची गदा आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले जाणार आहे.
तसेच स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे नेपाळचा लोकप्रिय आणि ताकदवान पैलवान देवा थापा विरुद्ध भारताचा आक्रमक पैलवान अमित लाखा यांची अतिउत्सुकतेची लढत. ही कुस्ती जाधव रोज मर्क स्पोर्ट्स प्रा.लि.चे संचालक दत्तात्रय जाधव यांनी पुरस्कृत केली आहे. एमिरेट्स होल्डिंग ग्रुप पुरस्कृत, पै. दगडू जाधव व पै. राजाराम जाधव यांच्या स्मरणार्थ ‘सोंडोली केसरी’ ही कुस्तीदेखील रंगणार आहे. या लढतीत महाराष्ट्र चॅम्पियन सतपाल सोनटक्के विरुद्ध समीर शेख अशी प्रेक्षकांना थरारक झुंज पाहायला मिळेल. या आणखीही काही भन्नाट लढती पाहायला मिळणार आहेत. या दंगलमध्ये सुमारे 100हून अधिक पैलवान सहभागी होणार आहेत.
या भव्य आणि दिव्य कुस्ती दंगलसाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोज मार्कचे पूर्वेश शेलटकर, काझी अब्दुल मतीन (उद्योगपती, दुबई), हिंद केसरी रोहित पटेल, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, पूर्वेश शेलटकर, हिमांशू गांधी, शैलेश पेठे (रोज मर्क लिमिटेड), पत्रकार विजय चोरमारे, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, डी.आर. जाधव (आण्णा), पत्रकार संपत मोरे, सर्जेराव माईंगडे, दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



























































